रत्नागिरी -आंब्याचा हंगाम लांबणीवर पडला आहे त्यात थंडी गायब झाली आहे, यामुळे आसमानी संकट आंबा बागायतदारांवर कोसळले आहे. आंब्यावर झेलेल्या विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे कोकणातील आंबा बागायतदार सध्या संकटात सापडला आहे. बदलत्या वातावरणामुळे किडीबरोबरच लष्करी अळीचा प्रादुर्भाव आंबा पिकावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. एकदा का ही आळी आंब्यावर आली की मोहर आणि कैरी खाण्याची गती तिचा सर्वाधिक असते.
आंब्यावर झालेल्या विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी चिंतेत आठ दिवसांमध्ये अधूनमधून निर्माण होत असलेल्या ढगाळ वातावरणाने आंबा कलमांच्या फुलोर्यावर कीडरोग दिसू लागले आहेत. त्यात रत्नागिरी तालुक्यात आंबा झाडांवर लष्करी अळी दिसून येत आहे. ही अळी मोहोरातील रस शोषून घेते आणि कैरी कुरतडून खराब करते. त्यामुळे आंबा बागायतदार चिंतेत आहेत.
आधीच लांबलेल्या पावसामुळे आंबा हंगाम लांबणार हे निश्चित. मात्र, त्यातही वातावरणातील बदलांचा परिणाम आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. कोकणात दीड महिना उशिराने डिसेंबर महिन्याच्या शेवटी थंडीचे आगमन झाले. त्यानंतर पालवलेली आंबा कलमे मोहोरु लागली होती, हे प्रमाण वीस टक्क्यांपर्यंत होते. मात्र, पुन्हा थंडी गायब झाली. त्यात अधुनमधून वातावरण बदलत असून दमट हवेमुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यासाठी योग्य त्या कीटकनाशकांची फवारणी करण्याचा सल्ला कृषी सल्लागार देत आहेत.
वाढत्या किडरोगामुळे कोकणातील आंबा बागायतदारांचा फवारणीचा खर्च प्रचंड वाढत आहे. नियमितपणे पंधरा दिवसांनी बागायतदार कीटकनाशकांची फवारणी करतात. मात्र, कीडरोगांमुळे 7 ते 8 दिवसांनी फवारणी करावी लागत आहे. सर्वसाधारणपणे एका फवारणीला हेक्टरी 25 हजार रुपये खर्च येत आहे. त्यामुळे यावर्षी समाधानकारक आंबा उत्पादन न झाल्यास आंबा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे..