रत्नागिरी - रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुतन इमारतीचे उदघाटन रत्नागिरीत आज बुधवारी करण्यात आले. या कार्यक्रमाला कोकणातले अनेक नेते हजर होते. राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे, आमदार भास्कर जाधव, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत आणि माजी खासदार आनंदराव अडसुळ हे एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी एकत्रित आलेल्या या सर्वांनी एकमेकांना चिमटे काढण्याची संधी सोडली नाही.
या व्यासपीठावरून पहिल्यांदा आमदार भास्कर जाधव यांनी भाषण केले. त्यावेळी भास्कर जाधवांनी भाषणातून पहिल्यांदा उदय सामंत यांना टार्गेट केले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सामंत यांनी वेगळे पॅनल उभे केले होते. त्याचा आधार घेत पुढल्यावर्षी आपण युती करूया का? असं मी सामंतांना विचारलं, पण त्यावर सामंत यांनी नकार दिला. तुमची युती परवडणारी नाही, पाहूया भविष्यात माझ्या मागणीचा आमदार सामंत विचार करतायत का असं म्हणत जाधवांनी सामंताना चिमटे काढले.
कार्यक्रमानिमीत्त तटकरे, जाधव, अडसुळ आणि सामंत एकाच व्यासपीठावर
सामंतांनंतर भास्कर जाधवांनी आपल्याच पक्षातील नेते सुनिल तटकरे यांच्याकडे मोर्चा वळवला. या कार्यक्रमाला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार येणार होते. ते सुरुवातीला कोकणातल्या पूरस्थितीची पाहणी करणार होते, मात्र काही कारणामुळे त्यांना ते शक्य झालं नाही. मात्र त्यांचेच असे म्हणत मोठा पॉझ घेवून खास असलेले तटकरे साहेब यांच्या हस्ते उद्घाटनाचा हा मोठा योग आला असल्याचे सांगत भास्कर जाधव यांनी तटकरे यांना चिमटे काढले.
त्यानंतर भाषणासाठी उभे राहिलेले म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी रत्नागिरीचे तीन माजी पालकंमंत्री एकाच व्यासपीठावर आल्याचा उल्लेख केला. पाच वर्षानंतर तटकरे आणि भास्कर जाधवांच्या मध्ये बसण्याची संधी मिळाली अशी गुगली टाकत भास्कर जाधव आणि तटकरे यांना चिमटे काढले. नंतर भाषणासाठी आलेल्या माजी खासदार आनंदराव अडसुळ यांनी तर भूमिका स्पष्ट आणि स्वच्छ असली पाहिजे असं सांगत शरद पवार आणि अडसुळ यांच्यातील संबधाचा दाखला दिला. हार-जीत मुळे नशिबाचे फेरे कसे बदलतात याची खंत त्यांनी जाहीर भाषणातून बोलून दाखवली.
त्यानंतर या सर्वांचा समाचार घेण्यासाठी राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे उभे राहिले. भाषणाच्या पहिल्याच वाक्यातून त्यांनी थेट म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्यावर निशाणा साधत चिमटा काढला. त्यानंतर तटकरेंनी भाषणातून उदय सामंत आणि भास्कर जाधवांवर निशाणा साधला. उदय सांमंत म्हणतात, भास्कर जाधव आणि माझे ट्युनिंग चांगेल आहे. पण आमच्या दोघातील ट्युनिंग पाहून तुला बरं वाटतंय, याचा मला आनंद आहे. २०१९ सालात एबी फॉर्म देण्याची वेळ येईल, त्यावेळी तो माझ्या हातात ठेवीन एवढं सांगून तटकरे यांनी भास्कर जाधव आणि उदय सामंतांवर निशाणा साधला. गुहागरामधून तुम्हाला बाहेर काढण्याची जवाबदारी मी स्वीकारली आहे असं सागत तटकरे यांनी भास्कर जाधवांना चिमटे काढले. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे खास असं म्हणुन पॉझ घेवून तटकरे यांना चिमटे काढणाऱ्या भास्कर जाधवांना सुद्धा तटकरे यांनी आपल्या भाषणातून चिमटे काढले.