रत्नागिरी -जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांना लवकरात लवकर कार्यभार न दिल्यास यवतमाळप्रमाणे रत्नागिरीतदेखील डॉक्टरांच्या राजीनामाचे सत्र सुरू होईल. त्यामुळे जिल्ह्यात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन त्याला जबाबदार राहील, असा इशारा मॅग्मोचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. भगवान पितळे यांनी दिला आहे.
यवतमाळमध्ये जिल्हाधिकार्यांनी डॉक्टरांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे नाराज झालेल्या तब्बल १२० डॉक्टरांनी राजीनामा देऊन जिल्हाधिकार्यांविरोधात एल्गार पुकारला आहे. त्याला राज्य मॅग्मो संघटनेनेदेखील पाठिंबा दर्शविला आहे. या संदर्भात रत्नागिरीतही जिल्हा मॅग्मो संघटनेची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर मॅग्मोने आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी बोलताना जिल्हा मॅग्मो संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर भगवान पितळे म्हणाले की, यवतमाळप्रमाने रत्नागिरीत देखील डॉक्टर राजकीय बळी ठरू लागले आहेत. ही सरंजामशाही असल्याचे ते म्हणाले. राजकीय हस्तक्षेपामुळे दरदिवशी डॉक्टरांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हा हस्तक्षेप थांबण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे काही कारणास्तव रजेवर गेले होते मात्र परत येऊन रुजू होऊनही प्रशासनाने त्यांना कार्यभार दिलेला नाही. या विरोधात त्यांनी प्रशासनाला जाब विचारला मात्र उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे डॉ. अशोक बोल्डे प्रशासना विरोधात लढले. मात्र काहीच फायदा झालेला नाही. आता त्यांना जिल्हा मॅग्मो संघटनेने पाठिंबा दिला असून आमची राज्य मॅग्मो संघटनेसोबत चर्चा सुरू आहे. डॉ. बोल्डे यांना त्वरित कार्यभार न दिल्यास लवकरच जिल्हा मॅग्मो संघटना आपला निर्णय जाहीर करेल. त्यामुळे जिल्हात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, गेल्या सात महिन्यापासुन अपुर्या कर्मचार्यांकडुन जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही परिस्थिती अत्यंत भयावह आहे. जिल्ह्यात केवळ ५ अधिकारी हे वर्ग एकचे अधिकारी असुन फिजिशियनसह अन्य विभागातील डॉक्टरांची कमतरता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सध्या यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्यसमस्या निर्माण झाली आहे. डॉक्टरांनी प्रशासनाविरोधात एल्गार पुकारल्याने आरोग्य व्यवस्था पुरती कोलमडली आहे. अशी वेळ रत्नागिरीत येऊ नये. कारण आम्ही जनतेशी बांधिल आहोत. मात्र आमच्या अधिकारांवरच घाला घालण्याचा प्रयत्न झाल्यास यवतमाळप्रमाणे रत्नागिरीदेखील संप करण्याशिवाय पर्याय नाही असे सांगून पितळे यांनी प्रशासनाला एकप्रकारे अल्टीमेटमच दिला आहे.