रत्नागिरी -गेले काही दिवस ओबीसी अध्यादेशाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पण अखेर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या अध्यादेशावर मोहर उमटविली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे. ते चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे पक्षाच्या कार्यक्रमासाठी आले असताना बोलत होते.
'निवडणुका नव्या अध्यादेशातील तरतुदींनुसार व्हाव्यात' -
यावेळी तटकरे म्हणाले की, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात तीव्रतेने मांडला गेला होता. आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या नव्या अध्यादेशातील तरतुदींनुसार व्हाव्यात, त्याचबरोबर आता ज्या काही जिल्हा परिषदांच्या निवडणूका घोषित झाल्या आहेत, त्या निवडणुकादेखील राज्य आयोगाला विनंती करून त्या जर का निवडणुका थांबविता आल्या आणि नवीन अध्यादेशामध्ये ओबीसी आरक्षणाबाबत ज्या काही तरतुदी आहेत, त्यानुसार जर का त्या घेता आल्या, तर तेही योग्य होईल, असे आपले मत असल्याचे खासदार सुनील तटकरे यावेळी म्हणाले. राज्यसभेच्या पोटनिवडणूकीबाबत तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. स्वर्गीय खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे राज्यसभेची पोटनिवडणूक लागली आहे. यापूर्वी अशा पोटनिवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी जर का काँग्रेस प्रयत्न करत असेल, तर ते योग्य आहे, असे आपले मत असल्याचे खासदार सुनील तटकरे यावेळी म्हणाले.