रत्नागिरी : जिल्ह्यातील ५,९९७ शासकीय आस्थापनांकडून महावितरणचे तब्बल १४ कोटी ६३ लाख ५४ हजार रुपये येणे आहे. जिल्ह्यात एकूण ८३ कोटींची थकबाकी असून, थकबाकी वसुलीचे मोठे आव्हान महावितरणापुढे आहे. थकबाकीमुळे एकीकडे औद्योगिक ग्राहकांना नोटीस पाठवणे आणि घरगुती ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे काम सुरू असताना शासकीय कार्यालयांनीही थकबाकी शिल्लक ठेवली आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत जिल्ह्यात मीटरवरून रीडिंग न घेता मागील बिलावरून सरासरी बिले काढण्यात आली होती. मात्र, वाढीव रकमेची असल्याने ही बिले अनेकांकडून भरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे थकबाकीचा आकडा वाढत जाऊन तब्बल ८५ कोटींपर्यंत पोहोचला आहे.
पथदिव्यांच्या ग्राहकांकडून ८ कोटी १२ लाख येणे..
जिल्ह्यात पथदिव्यांचे १ हजार ४९५ कार्यालयीन ग्राहक आहेत. त्यांच्याकडून सर्वाधिक ८ कोटी १२ लाख २० हजार रुपये येणे आहे. यातील चिपळूण विभागात २१८ ग्राहकांकडून १ कोटी ३७ लाख ९६ हजार; खेड विभागात ४५० ग्राहक असून त्यांच्याकडून २ कोटी ६६ लाख १० हजार, रत्नागिरी विभागात ८२७ ग्राहक असून त्यांच्याकडून ४ कोटी ८ लाख १५ हजार थकीत आहे.