रत्नागिरी - सरकार ज्या घोषणा जाहीर करतेय, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. निसर्ग चक्रीवादळानंतर सरकारने घोषणा केल्याप्रमाणे मदत झाली नाही. सरकारने घोषणा केली होती की, शेतकऱ्यांना बांधावर बी-बियाणे, खते देऊ. मात्र, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात माहिती घेतली असता सरकारचा एकही प्रतिनिधी बांधावर खते, बी-बियाणे घेऊन पोहोचलेला नाही. सरकारच्या करणी आणि कथनीमध्ये फरक असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. आज दरेकर कोकण दौऱ्यावर आहेत. ते रत्नागिरीत आले असता त्यांनी शासकीय विश्रामगृहामध्ये जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांच्याकडून निसर्ग चक्रीवादळ, कोरोना, शेतकरी बी-बियाणे या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सरकारच्या करणी आणि कथनीमध्ये फरक - प्रविण दरेकर - प्रवीण दरेकरांची महाविकास आघाडीवर टीका
प्रामाणिकपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्याला 50 हजार रुपये देऊ, अशी घोषणा सरकारने केली होती. मात्र, 50 पैसे सुद्धा प्रामाणिक शेतकऱ्याला दिलेले नाहीत. चक्रीवादळाने नुकसान झालेल्या शेतकऱ्याला झाडामागे पैसे द्यावेत, असे आम्ही सांगितले. शरद पवारांनी देखील सांगितले. मात्र, त्याबाबतही काही झाले नाही. त्यामुळे तुटपुंजी मदत काय कामाची? असा सवाल देखील दरेकरांनी उपस्थित केला.
प्रामाणिकपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्याला 50 हजार रुपये देऊ, अशी घोषणा सरकारने केली होती. मात्र, 50 पैसे सुद्धा प्रामाणिक शेतकऱ्याला दिलेले नाहीत. चक्रीवादळाने नुकसान झालेल्या शेतकऱ्याला झाडामागे पैसे द्यावेत, असे आम्ही सांगितले. शरद पवारांनी देखील सांगितले. मात्र, त्याबाबतही काही झाले नाही. त्यामुळे तुटपुंजी मदत काय कामाची? असा सवाल देखील दरेकरांनी उपस्थित केला. शिवसेनेला कोकणाने भरभरून दिले. मात्र, त्याच कोकणाला द्यायची वेळ आली त्यावेळी शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार हात आखडता घेत असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली.
महाविकास आघाडीत तिन्ही पक्षात असंतोष खदखदत आहे. तिन्ही पक्षात कुठल्याच मुद्द्यांवर एकमत नाही. पूर्णपणे विसंवादानं भरलेलं सरकार आहे. त्यामुळे तिन्ही पक्षाचे सरकार फार काळ टिकून काम करू शकत नाही, असे देखील दरेकर म्हणाले. चीनच्या मुद्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे कान टोचणाऱ्या शरद पवारांच्या विधानावर प्रविण दरेकर यांनी सूचक विधान केले. शरद पवार संरक्षण मंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते आहेत. अशा परिस्थितीमध्ये सरकार म्हणून काय करावं लागतेय? त्याचे भान ठेवून त्यांनी मांडलेली भूमिका होती. कोरोनाच्या प्रश्नावर गोंधळलेल्या आणि भांबावलेल्या परिस्थितीत सरकार आहे. त्यामुळे मुंबईत आता गाड्यांवर कारवाईचे पाऊल राज्य सरकारनं उचललं असल्याचेही दरेकर म्हणाले.