रत्नागिरी- मुख्यमंत्र्यांचे या सरकारवर नियंत्रण नाही. यांच्या विसंवादातच हे सर्व अडकले आहेत. त्यामुळे फार काळ ही लोक एकत्रित राहणार नाहीत. अजून नीट खातीही वाटू शकलेले नाहीत, हे काय जनतेला न्याय देणार, हे सरकार विसंवादाने भरलेले असल्याचे सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी ते आज रत्नागिरीत आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार आसूड ओढले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, या सरकारमधील लोकांना राज्यातील जनतेला काय हवे आहे, याचा विचार करण्यासाठी वेळ नाही. एवढी ही मंडळी सत्तेमध्ये मश्गूल झाली आहेत. सत्तेसाठी आपापल्या भूमिकेला तिलांजली देण्यात आली आहे. सरकार आले तेव्हापासून स्थगितीचे दणादण निर्णय झाले. केवळ राजकीय द्वेषापलीकडे हे सरकार काहीच करत नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पोलिसांची खाती अॅक्सिस बँकेत वळविण्यात आलेली नाहीत, पूर्वीच्या आघाडी सरकारच्या काळातच ही खाती अॅक्सिस बँकेत वळविण्यात आली आहेत.
हे सरकार केवळ सूडबुद्धीने वागत असून अमृता फडणवीस यांची प्रतिमा मलीन करण्याचे काम सध्या या सरकारकडून सुरू असल्याची टीका दरेकर यांनी यावेळी केली. अमृता फडणवीस ट्विटर प्रकरणावरून मनसेने सल्ले देण्यापेक्षा पक्षाची जी अधोगती होत आहे. त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.