रत्नागिरी - लॉकडाऊनमुळे सध्या हजारो विवाह सोहळे रद्द झाले आहेत. परंतु, रत्नागिरीतील लांजा येथे विवाह सोहळा लॉकाडऊनच्या काळाचही अनोख्या पद्धतीने पार पडला. यावेळी तहसील कार्यालयातील कर्मचारी आणि पोलीसच वधू-वराचे माता पिता झाले होते. विषेश म्हणजे नंदूरबारमधून वधू-वरांवर ऑनलाइन अक्षता टाकल्या गेल्या आणि वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यात आले.
लॉकडाऊन दरम्यान रत्नागिरी येथे पार पडला अनोखा विवाह सोहळा... नातेवाईकांनी फेसबुकद्वारे टाकल्या अक्षता...
लॉकडाऊनच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात एक विवाहसोहळा संपन्न झाला. 10 मे 2020 या दिवशी 12 वाजून 30 मिनिटांच्या मुहूर्तावर हा विवाह सोहळा संपन्न झाला. अगदी नंदुरबारमधून वऱ्हाडी मंडळी या विवाह सोहळयात सहभागी झाली आणि त्यांनी अक्षात देखील टाकल्या. फेसबुकवरून देखील नातेवाईक मंडळी यावेळी सहभागी झाले होते. मुळ नंदुरबारमधील वाघाळे गावच्या ज्योती अभिसिंग चौरे या लांजा तहसील कार्यालयात लिपीक आहेत. त्यांचा विवाह हा धुळे येथील मनोहर नारायण अहिरे यांच्याशी निश्चित झाला होता.
हेही वाचा...नर्सेसला सलाम..! कोरोनाविरोधाच्या युद्धातील 'फ्रंट वॉरियर'
तहसील कार्यलयातील कर्मचारी आणि पोलीसच बनले वऱ्हाडी...
साखरपुडा झाल्यानंतर धुळ्यातील अहिरे यांच्या विटावे या गावी हा विवाह सोहळा संपन्न होणार होता. लग्नाची सारी तयारी देखील झाली. लग्नाची बोलणी करण्यासाठी ज्योती फेब्रुवारीमध्ये नंदूबार येथे गेल्या होत्या. त्यानंतर त्या लांजा येथे कामावर रूजू झाल्या. यावेळी मनोहर अहिरे त्यांना सोडण्यासाठी लांजा येथे आले आणि लॉकडाऊनमध्ये अडकून पडले. परिणामी सारी तयारी झालेली असताना महूर्त साधायचा कसा ? असा प्रश्न पडला. परंतु, लांजा तहसील कार्यालयाच्या तहसीलदार वनिता पाटील यांनी सारी जबाबदारी घेत लग्नाला आवश्यक असलेली प्रशासकीय मान्यता मिळवली आणि ठरल्या वेळेत महूर्त साधत हा विवाह सोहळा पार पडला.
नायब तहसीलदार मुलीचे मामा तर मंडल अधिकारी मुलाचे मामा...
10 मे रोजी 12 वाजून 30 मिनिटांनी पार पडलेल्या या विवाह सोहळ्याला तहसील कार्यालयातील कर्मचारी आणि मोजके पोलीस कर्मचारी वऱ्हाडी म्हणून सहभागी झाले होते. साऱ्या निमयांचे पालन करत हा विवाह सोहळा पार पडला. मुलीचे आई-वडिल म्हणून नायब तहसीलदार मनोहर कदम आणि पत्नी विमल कदम यांनी कन्यादान केले. तर, मुलीचे मामा म्हणून मंडल अधिकारी पांडूरंग कदम, भाऊ म्हणून कारकून महादेव चव्हाण यांनी जबाबदारी पार पाडली. शिवाय, मुलाकडून गोडावून व्यवस्थापक आय. एल. चल्लावाड दाम्पत्याने आई-वडिलांची जबाबदारी पार पाडली. तर, मामा म्हणून मंडल अधिकारी संतोष मराठे यांनी जबाबदारी पार पाडली.
हेही वाचा...लॉकडाऊन इफेक्ट : घरकाम करणाऱ्या महिलांची अवस्था बिकट, आर्थिक मदतीची गरज
लॉकडाऊनमुळे सध्या अनेक विवाहे सोहळे रद्द होत असताना प्रशासनातील अधिकारी आणि पोलीस अधिकारी वऱ्हाडी झाले आणि महूर्त साधला. अगदी हजारो कोसावरून नातेवाईक मंडळी देखील फेसबुकच्या माध्यमातून सहभागी झाले. त्यामुळे सध्या कोरोनाच्या काळातील लॉकडाऊनवाल्या या शादीची सर्वत्र जोरदार चर्चा आहे.