रत्नागिरी- गेल्या दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील मिरजोळे गावातील खालचापाट मधलीवाडी येथे भूस्खलन झाले आहे. 3 ते 4 एकर जमीन 20 ते 25 फुटांनी खचली आहे. त्यामुळे येथील भातशेती धोक्यात आली असून घरांनाही धोका निर्माण झाला आहे.
गेल्या 15 वर्षांपासून मिरजोळे खालचापाट मधलीवाडी परिसरात भूस्खलन होत आहे. यावर्षीही गेल्या दोन दिवसात शंभर फुट लांब भुसख्लन झाले. जमिनीचा मोठा भाग खचला आहे. त्यामुळे येथील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. याठिकाणी यापूर्वी 2006 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले होते. त्यावेळी जवळपास 20 एकर जमीन एकाचवेळी खचली होती. त्यामुळे येथील शेती, बागायत देखील उद्धवस्त झाली आहे.