रत्नागिरी - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत कोकण विभागीय मंडळाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. 98.77 टक्क्यांसह कोकण विभागीय मंडळाने पुन्हा एकदा राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. स्थापनेपासून राज्यात सलग नवव्यांदा प्रथम येण्याची परंपरा मंडळाने यावर्षीदेखील कायम राखली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या 10 वी च्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल बुधवार दि. 29 रोजी दुपारी 1 वा. जाहीर झाला. या निकालामध्ये राज्यातील एकूण 9 विभागीय मंडळांमध्ये कोकण बोर्डाचा सर्वाधिक 98.77 टक्के एवढा निकाल लागला. यावेळी
एकूण 33 हजार 732 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 33 हजार 686 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील 33 हजार 271 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
यामध्ये रत्नागिरीतील 11 हजार 250 मुले आणि 10 हजार 961 मुली उत्तीर्ण झाल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 5 हजार 702 मुले तर 5 हजार 358 मुली उत्तीर्ण झाल्या. या परिक्षेसाठी दोन्ही जिल्ह्यातून 17 हजार 229 मुले तर 16 हजार 457 मुली प्रविष्ठ झाल्या होत्या. मुलांची उत्तीर्ण संख्या 16 हजार 952 असून, त्याची टक्केवारी 98.39 एवढी आहे. मुलींची उत्तीर्ण संख्या 16 हजार 399 असून, त्याची टक्केवारी 99.16 एवढी आहे. म्हणजेच मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेत 0.77 एवढे जास्त आहे. विभागात 1813 पूनर्रपरिक्षार्थी विद्यार्थी परिक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 1414 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.