रत्नागिरी- गेले दहा दिवस प्रतिष्ठापीत झालेल्या बाप्पाला गुरुवारी निरोप देण्यात येणार आहे. गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर जड अंतःकरणाने बाप्पाला निरोप देतानाची लगबग सर्वत्र पाहायला मिळत आहे. त्यामुळेच यावर्षीच्या गणेशोत्सवातील अखेरच्या आरत्यांना सुरुवात झाली आहे.
कोकणात बाप्पाला निरोप देण्यासाठी लगबग; घराघरांतून ऐकू येत आहे आरत्यांचे सूर - konkan ganesh festival
गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर जड अंतःकरणाने बाप्पाला निरोप देतानाची लगबग सर्वत्र पाहायला मिळत आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवातील अखेरच्या आरत्यांना सुरुवात झाली आहे.
कोकणातला गणेशोत्सव हा वैविध्यपूर्ण आहे. कोकणात अगदी घराघरात गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. घरगुती गणेशोत्सवही सार्वजनिक गणेशोत्सवासारखा साजरा केला जातो. त्यामुळेच दरवर्षी कोकणीमाणूस कितीही अडथळे आले तरी या सणाला आपल्या गावी हमखास येतो. दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस तर काही ठिकाणी 10 दिवस मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. दहा दिवस घरात विराजमान झालेल्या बाप्पांना गुरुवारी निरोप देण्यासाठी घराघरात तयारी सुरु झाली.
कोकणातील अनेक घरे वर्षभर ओसाड असतात. मात्र गणेशोत्सवातील या दहा दिवसात या घरांमध्ये उत्साह ,चैतन्य आणि माणसांनीही भरून जातात. कोकणातील घराघरात हे चित्र पाहायला मिळते. दहा दिवसांच्या बाप्पाच्या मिरणुकीपुर्वी कोकणातल्या प्रत्येक घरात उत्तरपुजेपूर्वी आरतीचे सुरु ऐकू पडत आहेत. उत्तर पुजेनंतर गणरायाची वाजत गाजत मिरवणूक निघते. आरतीला घरातील प्रत्येक सदस्य उपस्थित असतात.