महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाणार रिफायनरी आंदोलन पुन्हा तापले, समर्थक अन् विरोधक २० जुलैला येणार आमने-सामने?

कोकण विकास समितीच्या माध्यमातून समर्थकांनी २० जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे निश्चित केले आहे. मात्र, आता प्रकल्प विरोधकही आक्रमक झाले असून याच दिवशी रत्नागिरीत आंदोलन करण्याचा तयारीत आहेत.

संग्रहित छायाचित्र

By

Published : Jul 17, 2019, 5:26 PM IST

रत्नागिरी -नाणार रिफायनरी प्रकल्प व्हावा, यासाठी त्याचे समर्थक २० जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला याला विरोध करण्यासाठी प्रकल्पाचे विरोधक ही याच दिवशी रत्नागिरीत आंदोलन करणार आहेत. त्यामुळे हे आंदोलन पुन्हा तापणार आहे.

नाणार प्रकल्पाला विरोध करणारे आंदोलनकर्ते

राजापूर तालुक्यात नाणार परिसरात येऊ पाहणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना रद्द झालेली आहे. मात्र, असे असले तरी हा प्रकल्प येथेच व्हावा, यासाठी प्रकल्प समर्थक आक्रमक झाले आहेत. यासाठी कोकण विकास समितीच्या माध्यमातून समर्थकांनी २० जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे निश्चित केले आहे. मात्र, आता प्रकल्प विरोधकही आक्रमक झाले असून याच दिवशी रत्नागिरीत आंदोलन करण्याचा तयारीत आहेत. जर रिफायनरी समर्थकांना मोर्चाची परवानगी मिळाली आणि आम्हाला परवानगी मिळाली नाही तरी २० जुलैला शांततेत आंदोलन करण्यासाठी आम्ही रत्नागिरीत धडकणार असल्याचे कोकण भूमिकन्या महामंडळाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

याबाबत जनहक्क सेवा समितीचे सत्यजीत चव्हाण यांनी सांगितले, की राजापूर तालुक्यातील नाणार परिसरातील १४ गावे आणि देवगड तालुक्यातली २ गावे अध्यादेश काढून रिफायनरीच्या भू संपादनासाठी निश्चित केली होती. त्या विरोधात ग्रामस्थांनी २ वर्षे सातत्याने तीव्र संघर्ष केला. सर्वच राजकीय पक्ष आणि सरकारला याची दखल घेणे भाग पडले. त्यामुळे प्रस्ताविक रिफायनरी नाणार मधून रद्द करण्यात आली. भू संपादनाचा अध्यादेश रद्द करणारे राजपत्रही २ मार्च २०१९ रोजी काढण्यात आले. उद्योगमंत्र्यांनी विधानपरिषदेतही पुन्हा नाणार परिसरात रिफायनरीसाठी भू संपादनाचा अध्यादेश काढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगितले. सात-बारा वरच्या औद्योगिक क्षेत्राच्या नोंदीही काढून टाकण्यात आल्या. असे असताना रत्नागिरी शहरातील बिर्ल्डस, हॉटेल व्यावसायिक, विशिष्टी विचारसरणीच्या संस्था यांनी स्वत:च्या फायद्यासाठी पुन्हा नाणारमध्ये रिफायनरी पाहिजे म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये कोकणाला समृद्ध करण्याची आश्वासने देणाऱ्या नकली आणि बनेल संस्थाही त्यात सहभागी झाल्या आहेत. आम्हा ग्रामस्थांच्या आणि येथील निसर्गाच्या टाळूवरील लोणी खायच्या वृत्तीची ही माणसे म्हणजे कोकणाला कलंक आहेत, असे चव्हाण यांनी सांगितले.

रिफायनरीला समर्थन करणाऱ्या या लोकांची नाणार परिसरातील जमिनीत असलेली गुंतवणूक, काही दलालांवर असलेला गुंतवणूकदारांचा दबाव यासाठीच हे लोक रिफायनरीचे समर्थन करत आरोप असल्याचा चव्हाण यांनी यावेळी केला. ९५ टक्के स्थानिक जनतेचा या प्रकल्पाला विरोध आहे. त्यामुळे समर्थक २० जुलैला काढत असलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही देखील एकवटले आहोत. पोलिसांनी आमच्या मोर्चाला परवानगी दिली नाही तरी देखील आम्ही शांततेच्या माध्यमातून आमची ताकद दाखवून देणार आहोत. सुमारे ३ ते साडेतीन हजार ग्रामस्थ या मोर्चात सहभागी होतील, असा विश्वास भूमि कन्या एकता महामंडळाच्या सोनाली ठुकरुल यांनी व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details