रत्नागिरी- मिलिंद नार्वेकरांचा बंगला पाडला आता अनिल परबांचे रिसाॅर्ट केव्हा पाडणार, असा सवाल भाजप नेते माजी खासदार किरीट सोमैया यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. सोमैया यांनी या तोडलेल्या बंगल्याची सोमवारी (दि. 23 ऑगस्ट) मुरुड येथे जाऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवादही साधला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचे दापोली तालुक्यातील मुरुड गावातील अनधिकृत बंगला प्रकरण गेले काही दिवस गाजत होते. भाजप नेते किरीट सोमैया यांनी याबाबत प्रशासन तसेच केंद्राकडेही तक्रार केली होती. त्यानंतर सोमैया यांनी गेल्या आठवड्यात या ठिकाणी येऊन आठवडाभरात हे अनधिकृत बांधकाम तोडले नाही तर आंदोलन करण्याचा प्रशसनाला इशारा दिला होता. दरम्यान, मिलिंद नार्वेकर यांनी हा बंगला तोडण्याचे काम सुरू केले आहे. त्यानंतर आज भाजप नेते किरीट सोमैया यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली. जवळपास पंधरा मिनिटे मिलिंद नार्वेकर यांच्या घराबाहेर होते.
प्रशासनाला नार्वेकरांविरोधात गुन्हा दाखल करायचा नव्हता
प्रशासनाला मिलिंद नार्वेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायचा नव्हता. म्हणून प्रशासनाने मिलिंद नार्वेकर यांना स्वतः बंगला पाडलायला सांगितले, असा दावा यावेळी किरीट सोमैया यांनी यावेळी केला आहे.