दापोली ( रत्नागिरी ): भाजपा नेते किरीट सोमय्या अनिल परब यांचे दापोली येथील रिसॉर्ट तोडण्यासाठी त्यांच्या निवासस्थानाहून दापोलीत दाखल झाले ( Kirit Somaiya In Dapoli )आहेत. किरीट सोमय्या ठाकरे सरकारविरोधात अधिकच आक्रमक झाले आहेत. त्यांच्यासोबत भाजपा कार्यकर्त्यांचा मोठा ताफा आहे. विशेष म्हणजे, यावेळी त्यांनी एक प्रतिकात्मक हातोडाही सोबत घेतला आहे. दापोलीत त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी- शिवसेनेकडून काळे झेंडे घेऊन घोषणाबाजी करण्यात ( Protest Against Kirit Somaiya In Dapoli ) आली. दरम्यान, पोलिसांनी सोमय्या यांना त्या रिसॉर्टवर जाण्यापासून रोखले होते. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिला होता. सायंकाळी उशिरा सोमय्या हे त्या रिसॉर्टच्या दिशेने निघाले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीबाहेर घेऊन जाण्यात येत आहे.
सोमय्या म्हणाले : आम्ही ज्या सत्याच्या आग्रहासाठी याठिकाणी आलो होतो. तो आग्रह अजून सुरु आहे. सर्व्हे नंबर 446 जे रिसॉर्ट बांधले आहेत ते अनिल परब यांचे आहेत. अनिल परब यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. 30 तारखेला दापोली कोर्टात सुनावणी आहे. परब यांचा रिसॉर्ट तुटेपर्यंत तो रिसॉर्ट बांधण्यासाठी जो पैसा खर्च करण्यात आला त्यासंदर्भात ईडी, आयटी, ग्रीन ट्रिब्युनलकडे तक्रार केलीय. पोलिसांनी आम्हाला अटक केली असून रत्नागिरी जिल्ह्याच्या पलीकडे सोडणार आहेत, असं किरीट सोमय्या म्हणाले.
तो रिसॉर्ट माझा नाहीच : परिवहन मंत्री अनिल परब यांनी किरीट सोमैयांना प्रत्युत्तर दिले ( Anil Parab Open Challenge Kirit Somaiya ) आहे. हा रिसॉर्ट माझा नसून किरीट सोमैया हे नौटंकी करत आहेत. याबाबत मी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात जाणार आहे, असे परब यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. परब म्हणाले की, या प्रकरणात न्यायालयात याचिका दाखल आहे. पण, मी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात याबाबत दाद मागणार आहे. माझी प्रतिमा खराब करायची व लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम किरीट सोमैया करत आहेत. हा रिसॉर्ट माझा नाही आहे, हे मी अगोदरही सांगितलेले आहे. याबाबत ज्या काही वेगवेगळ्या यंत्रणांकडून चौकशा, कागदपत्रे तपासायचे होते ते सर्व झालेल आहे. यात माझा काही संबंध नाही. किरीट सोमैया वारंवार जाणून-बुजून हा रिसॉर्ट माझा आहे, असे सांगत आहेत. मात्र, किरीट सोमैया हा रिसॉर्ट पाडायला पालिकेचे नोकर आहेत का?, असा प्रश्नही परब यांनी उपस्थित केला आहे.
सोमय्यांना ताब्यात घेण्याची शक्यता : राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम, शिवसेना प्रभारी तालुका अध्यक्ष ऋषी गुजर यांच्या उपस्थितीत किरीट सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. व्यावसायिकदेखील यामध्ये सहभागी झाले होते. चोर है चोर है किरीट सोमय्या चोर है अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. सोमय्या यांना पोलीस ठाण्यात आणले असून, भाजपचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणावर याठिकाणी उपस्थित आहेत. सोमय्या यांनी दापोलीत पोहोचल्यावर अनिल परब आणि राज्य सरकार यांच्यावर आरोप केले आहेत. यानंतर किरीट सोमय्या पोलीस ठाण्यात दाखल झाले असून, पोलीस त्यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे. सोमय्या दापोलीत आल्याने या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.