रत्नागिरी - जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. रत्नागिरी तालुक्यातही पावसाचा जोर कायम असून सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे चांदेराई बाजारपेठ, सोमेश्वर, काजरघाटी, पोमेंडी, गुरूमळी हा नदीकाठचा परिसर जलमय झाला.
मुसळधार पावसाने नद्या-नाल्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. काजळी नदीला आलेल्या पुरामुळे चांदेराई किनारी भागात मंगळवारी सकाळीच पाणी भरले होते. काजळी नदीची धोक्याची पातळी ही 16.50 मीटर इतकी आहे. मात्र, पावसामुळे मंगळवारी सकाळीच नदीची पाणीपातळी 17.13 मीटर इतकी झाली होती. त्यामुळे काजळी नदीकाठच्या पोमेंडी खुर्द, काजरघाटी, सोमेश्वर, टेंभ्ये, नाचणे गुरूमळी या भागातही पुराचे पाणी भरले असून किनाऱ्यावरील शेती पाण्याखाली गेली आहे. गुरूमळी येथे पाणी पातळीत कमालीची वाढ झाल्याने नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेल्या काही महिन्याच्या लॉकडाऊनमुळे व्यापारी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. चांदेराई येथील व्यापाऱ्यांसमोर या पुरामुळे आणखी अडचणी उभ्या राहिल्या आहेत. निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे हरचिरी पुलावरून होणारी वाहतूक देखील रोखण्यात आली आहे.