रत्नागिरी -रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ईडीने पत्र पाठवले आहे. जरंडेश्वर साखर कारखाना कर्ज पुरवठा प्रकरणात हे पत्र आले आहे. कशा पद्धतीने कर्ज पुरवठा करण्यात आला, तारण काय घेण्यात आले आहे, आदी माहिती ईडीने मागितली असून तसा ईमेल रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आला आहे. या वृत्ताला बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनीही दुजोरा दिला आहे.
प्रकरण काय ?
साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने जप्त केला आहे. हा साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचा आहे. त्यामुळे एकप्रकारे हा राष्ट्रवादी काँग्रेसला हा एक धक्का आहे. त्यातच आता या साखर कारखान्याला कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकांकडून माहिती मागविण्यात आली आहे.
जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरण काय आहे?
राज्य सहकारी बँकेतील कथित 25 हजार कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गेल्या आठवड्यात कोरेगावजवळील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. हा कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकाच्या ताब्यात होता. त्यामुळे या कारवाईला राजकीयदृष्ट्या अधिक महत्त्व आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाप्रकरणी जरंडेश्वर साखर कारखाना जप्त करण्याची कारवाई केली आहे. हा साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या नातेवाईकाचा आहे. त्यामुळे ईडीने केलेली कारवाई ही थेट अजित पवारांना धक्का आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राजेंद्र घाडगे सध्या या कारखान्याचे काम पाहतात. या कारखान्यातील आर्थिक गैरव्यवहारांची न्यायालयातही सुनावणी सुरू आहे.