रत्नागिरी -आरामदायी प्रवास आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी निर्माण केलेली कोकण रेल्वेची विस्टाडोम कोच असलेली जनशताब्दी एक्सप्रेस गुरुवारी पहिल्यांदाच कोकण रेल्वे मार्गावरून धावली.
विस्टाडोम कोच असलेली जनशताब्दी एक्सप्रेस विस्टाडोम कोच असलेल्या जनशताब्दी एक्सप्रेसचा प्रवास
खरतर कोकण रेल्वे ज्या मार्गावरून धावते तो मार्ग डोळ्यात साठवणे म्हणजे एक अद्भुत अनुभव असतो. आजूबाजूला डोळे सुखावणारी हिरवाई, नीळ आकाश, डोंगर माथे आणि पावसाळ्यात ओसंडणारे धबधबे स्वर्गीय अनुभव देतात आणि प्रवास सुखकर होतो. मात्र नेहमीच्या रेल्वेच्या गाडीतून हा अनुभव पूर्णपणे मिळतोच असे नाही. त्यामुळे प्रवाशांच्या या आवडीला डोळ्यासमोर ठेवून कोकण रेल्वेने विस्टाडोम कोच असलेली एक बोगी जनशताब्दी एक्सप्रेसला जोडली आहे. गुरुवारी पहिल्यांदाच ही विस्टाडोम कोच असलेली जनशताब्दी एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावरुन धावली.
विशेष सोयीसुविधा -
या रेल्वेला जोडलेल्या या स्पेशल बोगीला प्रशस्त काचा बसवण्यात आल्या आहेत. यामुळे ट्रेनच्या खुर्चीत बसून एक वाईड व्ह्यू अनुभवता येतो. मोठमोठ्या खिडक्या बरोबरच बोगीत प्रशस्थ जागा आहे. यातील खुर्च्या मागे पुढे होतातच, पण गोल ही फिरतात. यामुळे प्रवासी आपल्याला हव्या तशा खुर्च्या ऍडजस्ट करू शकता. या स्पेशल बोगीत फ्रीज डीप फ्रीज बरोबरच ओव्हन व अन्य सुविधा आहेत . सर्व सोयी सुविधां असणारी ही रेल्वे पर्यटक प्रवाशांना सुखावणारी आहे. याच विस्टाडोम रेल्वेचा पहिला प्रवास गुरुवारी 10 जून रोजी कोकण रेल्वे मार्गावरून झाला.
या बोगीचे छप्पर ही काचेचे असून, बोगीच्या मागील बाजूचे दालन विशेष आहे. यात उभे राहून मोठ्या काचेतून आपण कोकणचा निसर्ग अनुभवू शकतो. या रेल्वे सेवेमुळे येथील पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.