रत्नागिरी- जिल्ह्यात पडत असलेल्या दमदार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. खेड तालुक्यातील जगबुडी नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाली असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई-गोवा महामार्गावरच्या या जगबुडी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली.
जगबुडी नदीने गाठली धोक्याची पातळी; मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प - मुंबई-गोवा
जगबुडी नदीने तब्बल सात मीटर पर्यंत पाण्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे कोणतीही हानी होऊ नये यासाठी पोलिसांनी सतर्कता बाळगत पुलाजवळ चोख बंदोबस्त लावला आहे.
बुधवारी रात्री 8 च्या सुमारास जगबुडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान जगबुडी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याचे समजताच खेडचे तहसीलदार शिवाजी जाधव तसेच पोलिसांनीही पुलाकडे धाव घेतली. नदीच्या एकूण पाणीपातळीचा अंदाज घेऊन हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीही वाढ
चिपळूणमधील वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीही वाढ झाली आहे. त्यामुळे वाशिष्ठी पुलावरील वाहतूकही बंद करण्यात आली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक गुहागर बायपासमार्गे वळविण्यात आली आहे.