रत्नागिरी - जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या विषाणू तपासणी प्रयोगशाळेचे उद्घाटन मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात आले. रत्नागिरीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात 1 कोटी 7 लाख रुपये खर्चून ही अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे.
तळकोकणात मेडिकल कॉलेजची गरज असल्याचे मत यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, तसा प्रस्ताव तयार करा; आपण त्याबाबत सकारात्मक विचार करू, असे आश्वासन दिले. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब हे देखील व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते. शिवाय, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, आमदार शेखर निकम, आमदार प्रसाद लाड यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
विषाणू प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन रत्नागिरी जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, रुग्णांचे तपासणी नमूने कोल्हापूर आणि मिरज येथे पाठविण्यात येतात. त्या ठिकाणी इतरही जिल्ह्यातून नमूने तपासणीसाठी येतात. त्यामुळे या जिल्ह्यातील तपासणी नमून्याचे अहवाल विलंबाने प्राप्त होतात. या पार्श्वभूमीवर प्रयोगशाळा उभारणीची मागणी पुढे आली होती. जिल्ह्यातील रुग्णांच्या स्वॅब तपासणीसाठी खास बाब म्हणून ही प्रयोगशाळा उभारणीस मंजुरी प्रदान केली होती.
मंजुरी प्राप्त होताच युद्धपातळीवर प्रयोगशाळा उभारणीचे काम हाती घेऊन अवघ्या 10 दिवसांत ही अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या लॅबचे उद्घाटन केले. दररोज 250 स्वॅब या ठिकाणी तपासले जाणार आहेत. हळूहळू ही संख्या 300 वर जाणार असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली. शिवाय, ही लॅब अद्ययावत असल्याने इतर संसर्गजन्य आजारांचे देखील या ठिकाणी निदान होणार आहे.