रत्नागिरी -'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' चा जयघोष करत रविवारी अनंत चतुर्दशी दिवशी जिल्ह्यात ४९ सार्वजनिक तर ३३,५६३ खासगी बाप्पांना निरोप देण्यात आला. मांडवी किनारी गणेशभक्तांनी कोरोनाचे नियम पाळत बाप्पांचे विसर्जन केले. विसर्जनस्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पोलिसांचा चोख बंदोबस्त -
कोरोना प्रादुर्भावामुळे पोलिसांनी नागरिकांना बंधने घालून दिल्याने नागरिकांनी दुपारपासून विसर्जनस्थळी येण्यास सुरुवात केली होती. रत्नागिरी शहरातील मांडवी, भाट्ये, पांढरा समुद्र येथे विसर्जनासाठी काही प्रमाणात गर्दी झाली होती. सायंकाळी सहा वाजता पावसाला अचानक सुरुवात झाल्याने गणेशभक्तांची तारांबळ उडाली. विसर्जनादरम्यान गर्दीमुळे गोंधळ होऊ नये, यासाठी ५६ अधिकारी, ४११ अमलदार, २ एसआरपी, १ शीघ्र कृती दल, २० परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक, १० नवप्रविष्ठ अमलदार, २४१ होमगार्ड असा बंदोबस्त संपूर्ण जिल्ह्यात ठेवण्यात आला होता. तर रत्नागिरी शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहर आणि शहरांबाजूच्या मांडवी, भाट्ये, मिरजोळे, साखरतर, कुवारबाव या विसर्जनस्थळीही पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ७ अधिकारी, ४० अंमलदार, १५ प्रविष्ट अंमलदार आणि २० होमगार्ड हे बंदोबस्तासाठी नेमण्यात होते. रात्री दहावाजेपर्यंत विसर्जन सोहळा सुरु होता.
हेही वाचा -वर्सोव्यात गणेश विसर्जनादरम्यान 5 मुले समुद्रात बुडाली