रत्नागिरी -जिल्हा प्रशासनाने लसीकरणासाठी जिल्ह्याला नेमक्या किती लसी प्राप्त झाल्या, किती साठा उपलब्ध आहे, हे जाहीर करायला हवे. लसीकरणाबाबत प्रशासनाने पारदर्शक पद्धतीने काम करावे, जेणेकरून लोकांचे जीव धोक्यात न टाकता होत असलेली गैरसोय टाळता येईल, अशी मागणी माजी खासदार तथा भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला कोरोनाने विळखा घातला असतानाच लसीकरणाचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. मिस्त्री हायस्कूलमधील 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणावेळी झालेली चेंगराचेंगरी आणि जिल्हा प्रशासनाचे कुचकामी ठरलेले नियोजन समोर आल्यानंतर निलेश राणे यांनी ही प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली आहे.
'लसीकरणात पारदर्शकता आणावी'
याबाबत बोलताना राणे म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने या सर्व मोहिमेत जर पारदर्शकता ठेवली असती तर लोकांचे जीव धोक्यात आले नसते. जिल्ह्यात लसीकरणाची नोंदणी करण्यासाठी दिलेली लिंक उघडल्यास लगेच नोंदणी पूर्ण झाल्याचे दिसून येते. लसी उपलब्ध असतील तर मग सलग लसीकरण का घेतले जात नाही? त्यामुळे यात कुठेतरी पाणी मूरत असल्याचा संशय बळावतो आहे. याबाबत असंख्य नागरिकांच्या तक्रारी येत असल्याचं राणे यांनी यावेळी म्हटले. दरम्यान अशावेळी जिल्हा प्रशासनाने पारदर्शकता ठेऊन रत्नागिरी जिल्ह्यासाठी कोणत्या प्रकारच्या किती लसी शासनाकडून प्राप्त झाल्या, तालुक्यांमध्ये किती वाटप करण्यात आल्या, किती साठा उपलब्ध आहे, तसेच किती नागरिकांना लसी देण्यात आल्या, याची माहिती जाहीर करावी. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांची गैरसोय टाळता येईल, असं राणे यांनी यावेळी म्हटले आहे.
हेही वाचा -बार-हॉटेल मालकांप्रमाणे शेतकरी, कष्टकऱ्यांचीही दखल घ्या; रक्षा खडसेंचे शरद पवारांना पत्र