रत्नागिरी - कोणताही प्रकल्प असेल तर केंद्र आणि राज्य हे एकत्रितपणे त्या ठिकाणी उद्घाटनं करत असतात, केंद्रीय नागरी उड्डाण खात्याकडून मुख्यमंत्र्यांना सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी बोलावणं आलं तर त्यामध्ये गैर मानण्याचं कारण नाही, असं विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते.
विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हेही वाचा -चिपी विमानतळाला दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्या - आमदार नितेश राणे
- विमानतळ उद्घाटनाचा कार्यक्रम नागरी उड्डाण खात्याच्या अंतर्गत - दरेकर
सध्या सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरून राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना बोलावलंच पाहिजे असं काही नाही, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं होतं. याबाबत बोलताना दरेकर म्हणाले की, विमानतळाचं उद्घाटन केंद्र सरकार, राज्य सरकार असे एकत्रितपणे झालं तरी आम्हाला काही दुःख नाही. मात्र, हा विषय नागरी उड्डाण खात्याचा आहे. त्यांच्या नियंत्रणाखाली कार्यक्रम होत असतो, आणि त्याला मुख्यमंत्री येणार असतील तर त्याला विरोध करण्याचं कारण नाही, असं दरेकर यावेळी म्हणाले.
- शासकीय उपक्रमाचं उद्घाटनाची तारीख पक्ष जाहीर करत नाही - दरेकर
कोणत्याही शासकीय उपक्रमाचं उद्घाटन असतं, त्यावेळेला पक्ष तारीख जाहीर करत नसतो. ज्या सरकारचा तो उपक्रम असतो, ते सरकार त्या ठिकाणी अधिकृतरीत्या जाहीर करत असतं. नागरी उड्डाण हे खातं केंद्राच्या अखत्यारीत येतं, त्यामुळे त्याच्या परवानग्या, कार्यक्रम, ते सुरू करणं असेल ते संपूर्णपणे केंद्र सरकारचं नागरी उड्डाण खातं ठरवत असतं, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना भेटून उद्घाटनाचा मुहूर्त निश्चित केलेला आहे. त्यामुळे केंद्राच्या या खात्याने ठरवलेला जो मुहूर्त असेल तोच त्या ठिकाणी कायदेशीर असणार आहे. त्यामुळे पक्षीय जे कोणी काही बोलत असेल त्याला काही अर्थ नाही, असा टोला दरेकर यांनी शिवसेनेला लगावला आहे.
हेही वाचा -चिपी विमानतळावरून लवकरच प्रवास करता येणार - विनायक राऊत