रत्नागिरी - तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी रत्नागिरी येथे प्राथमिक आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी मी विरोधकांना उत्तर देण्यासाठी नाही, तर कोकणवासियांना दिलासा देण्यासाठी आलो आहे, असे स्पष्ट केले. मी इथे फोटोसेशन करायला नाही आलो; तसेच हेलिकॉप्टरमधून नाही, तर जमीनीवरुन पाहणी करणार आहे असेही मुख्यमंत्री ठाकरे हे म्हणाले.
'फोटोसेशनसाठी नव्हे, तर कोकणवासियांना दिलासा देण्यासाठी आलोय' पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय -
रत्नागिरीमधील प्राथमिक आढावा घेतला आहे. नुकसानग्रस्तांना कोणत्या निकषानुसार मदत जाहीर करायची याचा निर्णय पूर्ण आढावा झाल्यानंतर घेण्यात येईल. तसेच, पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी रत्नागिरीमध्ये दिली. या दौऱ्यादरम्यान आपण जास्त फिरण्यापेक्षा महत्त्वाच्या गोष्टींना वेळ देणार असल्याचेही ते म्हणाले.
मोदी महाराष्ट्राला मदत करतील -
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्याप्रमाणे गुजरातला मदत जाहीर केली, त्याचप्रमाणे ते महाराष्ट्रालाही मदत करतील अशा विश्वास ठाकरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
तौक्तेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौरावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सकाळी साडे आठ च्या दरम्यान विमानतळावर पोहचले. यावेळी विमानतळावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी कोकण दौरा केला आहे. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांची उपस्थिती होती.
विशेष जीआर लागू करावा - उदय सामंत
निसर्ग चक्रीवादळाच्यावेळी ज्याप्रकारे विशेष जीआर काढला होता तो तसाच पुढे लागू करण्यात यावा अशी मागणी आपण मुख्यमंत्री महोदयाकडे करणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
काय म्हणाले यावेळी मुख्यमंत्री -
केंद्र सरकारकडे करणार मागणी
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रत्येकाला मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कृषी, आंबा बागायदार, घरे यासह नुकसान झालेल्या प्रत्येक घटकाला मदत दिली जाईल. नुकसानग्रस्ताना मदत देण्याचे निकष खूप जुने आहेत. त्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. या बाबतची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
किनारी भागात भूमिगत वीज वाहिन्या, पक्की घरे
तसेच केंद्र महाराष्ट्र राज्याला मदत नक्की करेल याचा मला विश्वास आहे. कोकण किनार पट्टीवर दर वर्षी वादळे येऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होतेय, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. किनारी भागात भूमिगत वीज वाहिन्या, पक्की घरे यास अन्य उपयोजना करण्यावर भर दिला जाईल, यासाठी केंद्र सरकारने मदत करण्याची आवश्यकता असल्याचं ते यावेळी म्हणाले.
तात्काळ मदतीबाबत निर्णय घेतला जाईल
तसेच दोन दिवसात पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश आपण दिले आहेत, पंचनामा पूर्ण होऊन बाधितांसह नुकसानीचा आकडा समोर आल्यानंतर तात्काळ मदती बाबत निर्णय घेतला जाईल, माझा पॅकेजवर विश्वास नाही, मात्र मदत योग्य प्रकारे देऊन कोकणी माणसाला पुन्हा उभे करू असं अश्वासन त्यांनी यावेळी दिलं.
मला लसीकरणात राजकारण करायचे नाही
कोरोनाचा फैलाव वाढतोय, विषाणूमध्ये बदल झाला आहे, नवा विषाणू इतरांना बाधित करण्याचा वेग वाढत असल्याने प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे, लसीकरणाची गती कमी आहे. लसीचा पुरवठा व उत्पादन कमी आहे, तो वाढला पाहिजे, 12 कोटी डोस खरेदीची राज्य सरकारची तयारी आहे. मला लसीकरणात राजकारण करायचे नसल्याचे सांगून केंद्र देईल तेव्हा लस तात्काळ घेतली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - 'पी-305 बार्ज' : मृतांचा आकडा 49 वर; बचावकार्य सुरुच