रत्नागिरी - गेल्या महिनाभर चिपळूण तालुक्यातील खडपोली येथील 'निकृष्ट धान्याचा शालेय पोषण आहार' हा विषय गाजत आहे. मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या गोदाम मालक आणि धान्य पुरवठा करणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई व्हावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते मुराद अडरेकर यांचा लढा सुरू आहे. मात्र, याप्रकरणी न्याय मिळत नसल्याने मुराद अडरेकर येत्या १५ ऑगस्ट रोजी उपोषण करणार आहेत. चिपळूण पंचायत समितीच्या आवारात कोरोना काळातील सर्व शासकीय नियमांचे पालन करून हे उपोषण करणार असल्याचे अडरेकर यांनी सांगितले.
जिल्ह्यात महिनाभरापूर्वी निकृष्ट पोषण आहाराचा मुद्दा समोर आला होता. रत्नागिरी जिह्यात वाटप करण्यात येणारा पोषण आहार ज्या चिपळुण तालुक्यातील खडपोली येथील गोडाऊनमध्ये साठवून ठेवला जातो, पॅकिंग केला जातो आणि वितरित केला जातो त्या गोडाऊनमधून दुर्गंधी येत असल्याने, स्थानिकांनी आवाज उठवला होता. यानंतर साठवून ठेवण्यात आलेला पोषण आहार हा निकृष्ट, सडलेला, दुर्गंधीयुक्त आणि आरोग्यास हानिकारक असल्याचे स्पष्ट झाले होते.