रत्नागिरी -कोरोनामुळे सध्या देशभर लॉकडाऊन सुरू आहे. याचा मोठा फटका राज्यातील प्रत्येक क्षेत्रासह जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायालाही बसला आहे. विशेष म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव ऐन हंगामात सुरू झाला. मात्र, हंगामात होणाऱ्या उत्पन्नावर पुढील काही महिन्यांची बेगमी केली जाते. अशाच वेळी नेमका कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे लॉकडाऊन सुरू झाला, आणि या व्यवसायातून होणारी करोडो रुपयांची उलाढाल ठप्प झाली. त्यामुळे आता यातून सावरायचं कसं असा प्रश्न हॉटेल व्यावसायिकांसमोर आहे.
कोकणात गेल्या काही वर्षांत पर्यटन जोर धरू लागलं आहे. त्यात पर्यटकांना गोव्यात मिळणाऱ्या सोयीसुविधा कोकणातच मिळू लागल्याने गोव्यात जाणाऱ्या अनेक पर्यटकांची पावलं आता कोकणातंच स्थिरावू लागली आहेत. समुद्रकिनारे हे कोकणातलं खास आकर्षण. जोडीला प्राचीन मंदीरं, ऐतिहासिक वास्तू, तसेच अनेक महनीय व्यक्तींच्या पदस्पर्शाने इथली भूमी पावन झालेली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला, तर मंडणगड-दापोलीपासून ते थेट राजापूरपर्यंत पर्यटकांना पाहण्यासारखी अनेक ठिकाणं आहे. त्यामुळे एकीकडे पर्यटन वाढीस लागलं असताना साहजिकच हॉटेल व्यवसायही वाढू लागला. अलीकडच्या काळात अनेकजण डोक्यावर कर्ज घेऊन या क्षेत्रात उतरले आहेत. आणि या व्यवसायात स्थिरावण्याचा प्रयत्न करत आहेत.
हॉटेल - लॉजिंग व्यवसायाला कोरोनाचा मोठा फटका, करोडो रुपयांची उलाढाल ठप्प रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनच्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास 500 ते 550 हॉटेल्स आणि लॉज आहेत. मोठ्या हॉटेल्स-लॉजचं हंगामात दिवसाचं उत्पन्न जवळपास 1 लाख ते लाखाच्या पुढे असतं, तर छोट्या हॉटेल्सचं उत्पन्न हंगामात दिवसाला 30 ते 40 हजार असतं. त्यामुळे एका हॉटेलची दिवसाची सरासरी 70 ते 75 हजार रुपये पकडली, तरी 500 हॉटेल्सची दिवसाला किमान साडेतीन ते चार कोटी रुपयांची उलाढाल होते. या तीन ते चार महिन्यांत होणाऱ्या उत्पन्नावर पुढील काही महिन्यांची बेगमी हॉटेल व्यावसायिक करत असतात. कारण पावसाळ्यात जवळपास 4 ते 5 महिने या व्यवसायात मंदी असते. त्यामुळे या महिन्यांतील खर्चाचं नियोजन हंगामात होणाऱ्या उत्पन्नातून करावं लागतं.
यावर्षी ऐन हंगामात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आणि देशभर लॉकडाऊन सुरू झाला. सध्या चौथा लॉकडाऊन सुरू आहे. 2 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लॉकडाऊन सुरू झाल्याला उलटला आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसाय पुर्णतः ठप्प झाला. करोडोंची उलाढाल ठप्प झाली. अलीकडे होम डिलिव्हरीला परवानगी मिळाली आहे, मात्र त्यालाही फारसा प्रतिसाद नाही. त्यामुळे खर्च कसे भागवायचे, कामगारांचे पगार कुठून द्यायचे, टॅक्स कसा भरायचा असे अनेक प्रश्न हॉटेल व्यवसायिकांसमोर उभे आहेत. कर्जाचे हप्ते ऑगस्टपर्यंत न भरण्यासाठी सूट देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर काय, लाखोंचे हप्ते कसे फेडायचे असा गहन प्रश्नही हॉटेल व्यावसायिकांसमोर उभा आहे. सध्या परिस्थिती पूर्णतः बदलत आहे. अनेकजण खर्चाच्या बाबतीत हात आखडता घेत आहेत. तर इथल्या पर्यटनावरही याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साहजिकच हॉटेल-लॉजिंग, रिसॉर्ट व्यवसायाला भविष्यात याचा आणखी मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
हॉटेल व्यावसायाला पुन्हा उभारी घेता यावी यासाठी, वेगवेगळ्या प्रकारचे जे टॅक्स आहेत, त्यामधून हॉटेल व्यवसायाला सूट द्यावी. अनेक टॅक्स हे वर्षभराचे घेतले जातात, मात्र आता व्यवसायच ठप्प आहे, त्यामुळे या टॅक्समध्ये सूट मिळावी, कर्जाच्या परतफेडीमध्ये काहीतरी सूट द्यावी, विज बिलांमध्ये सवलती द्याव्यात अशा मागण्या हॉटेल व्यवसायिकांमधून होत आहेत. त्यामुळे या क्षेत्राला पुन्हा स्वतःच्या पायावर उभं करायचं असेल तर या क्षेत्रासाठी सरकारकडून काही ठोस निर्णय होणं आवश्यक आहे. नाहीतर तर हा व्यवसाय पुरता कोलमडून जाईल, असे मत येथील हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केले.