रत्नागिरी- चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील एका व्यावसायिकाच्या डोक्यात लोखंडी पार घालून जखमी केल्याची घटना समोर आली आहे. सुनील सिताराम जाधव, असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने व्यावसायिक गणेश तुकाराम कोकाटे यांना जबर मारहाण केली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी सुनिल जाधववर सावर्डे पोलीस ठाण्यात अनेक प्रकारच्या गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.
चिपळूणमध्ये व्यावसायिकाला मारहाण, गुन्हा दाखल - व्यावसायिक
चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील एका व्यावसायिकाच्या डोक्यात लोखंडी पार घालून जखमी केल्याची घटना समोर आली आहे.
गणेश कोकाटे व त्यांचे मोठे बंधू मुरलीधर कोकाटे हे नेहमी प्रमाणे सकाळी दुकानात गेले होते. त्यानंतर त्यांच्याच जागेत सुरू असलेले बांधकाम कोकाटे कामगारांना दाखवायला गेले होते. त्यावेळी त्याठिकाणी सुनील जाधव यांनी येवून बांधकाम करू नका, असे सांगत शिवीगाळ केली. मात्र, आम्ही आमच्या जागेत बांधकाम करतोय तुम्हाला काही अडचण, असे कोकाटे यांनी सांगितले. त्यानंतर सुनील जाधवने गणेश कोकाटेंना मारहाण केली. तसेच त्यांच्या डोक्यावर लोखंडी पारही मारली. तर सुनील जाधवचा भाऊ सुधीर जाधव व त्यांच्या २ मुलांनीही या मारहाणीनंतर परत एकदा गणेश कोकाटेंना मारहाण केली आहे, असा आरोप कोकाटे यांनी केला आहे.
मारहाण केल्यानंतरही सुनील जाधव याने कोकाटे यांच्या मोठ्या भावाच्या दुकानात जाऊन त्यांना मारण्याची धमकी दिली. त्यांनतर त्याने दुकानातील मालाचे लाखोंचे नुकसान केले. दरम्यान मारहाणीत जखमी गणेश कोकाटेंना उपचारांसाठी सावर्डे आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.