रत्नागिरी जिल्ह्यात आणखी कडक लॉकडाऊनबाबत गुरुवारी निर्णय, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत - रत्नागिरी लॉकडाऊन
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आणि तिसरी लाट रोखण्यासाठी काही कडक निर्बंध लागू करण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाऊन करण्याबाबत गुरुवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
रत्नागिरी -जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आणि तिसरी लाट रोखण्यासाठी काही कडक निर्बंध लागू करण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाऊन करण्याबाबत गुरुवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. झुम अॅपद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही - सामंत
यावेळी सामंत म्हणाले, माझी रत्नागिरी माझी जबाबदारी महाराष्ट्रातील पहिले अभियान जिल्ह्यात राबविण्यात आले. यामध्ये 758 जण बाधितांना शोधून काढण्यात आले. त्यांच्यावर आता योग्य ते उपचार सुरू आहेत. ही मोहीम राबवली नसती, तर प्रसार आणखी वाढला असता. महिला रुग्णालयात 140 बेडचे कोविड सेंटर गुरुवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते सुरू करण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही. याची पूर्ण तयारी प्रशासनाने केली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये म्हणून रायगड जिल्ह्यातून 16 आणि 5 टनाचे दोन टँकर मिळणार आहेत. ऑक्सिजनचा जादा कोटा मंजूर करून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सर्वांच्या विचारानंतर हा निर्णय होईल - सामंत
दुसरी लाट स्थिर होताना दिसत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. म्हणून पालकमंत्री अनिल परब आणि सर्व घटकांशी चर्चा करून सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातही गुरुवारी लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, याचा विचार होईलच. परंतु डिलिव्हरीवर जास्त भर देऊन कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र सर्वांच्या विचारानंतर हा निर्णय होईल, असे उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.