रत्नागिरी -रत्नागिरी जिल्ह्यात रात्रभर पावसाची संततधार सुरू आहे. आज सकाळपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. त्यात किनारपट्टी भागात वेगवान वारेही वाहत आहेत. आज दिवसभर वाऱ्याचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, तसेच नागरिकांनी समुद्राच्या जवळ जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नागरिकांना सावधानतेचा इशारा
भारतीय हवामान विभाग, मुंबई व मंत्रालय नियंत्रण कक्ष यांच्याकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या माहितीनुसार 13 ऑक्टोबर 2020 ते 17 ऑक्टोबर 2020 यां कालावधीत राज्यात विजेच्या कडाकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. विशेषतः किनारपट्टीलगतच्या सर्व जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व यंत्रणांना सावधानतेचा व सुरक्षिततेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्र खवळलेला असल्याने मच्छिमारीसाठी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. अतिवृष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे सखल भागात नागरिकांनी सतर्क रहावे. विजेच्या कडकडाटासह वादळी वारा वाहणार असल्याने मोकळ्या जागेत उभे राहू नये. विजेचे खांब, लोखंडी वस्तू, विद्युत वस्तूंपासून दूर रहावे. वीजा चमकत असताना संगणक, टीव्ही आदी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा. विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. धातूच्या वस्तूपासून दूर रहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
..तर 'या'नंबरवर साधा संपर्क
नागरिकांनी कोणतीही आपात्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी यांनी कळविले आहे.
नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक
जिल्हा नियंत्रण कक्ष-02352-226248/222233
जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष- 02352-222222/100