रत्नागिरी- जिल्ह्यात रात्रीपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. मध्यरात्री सोसाट्याचा वारा आणि विजांच्या गडगडाटासह पावसाने बरसात केली. बुधवारी दुपारनंतर पावसाने जोर धरला होता. आज पुन्हा पावसाने संपूर्ण जिल्ह्यात दमदार सलामी दिल्याने खऱ्या अर्थाने जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्याचे चित्र दिसत आहे.
जिल्ह्यात गेले काही दिवस पावसाचा लपंडाव सुरू होता. पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांनी पेरण्याही उशिरा केल्या. मध्यंतरी पावसाने चांगली हजेरी लावली होती. पण त्यानंतर मात्र पावसाने जिल्ह्यात पाठ फिरवली. अधूनमधून किरकोळ सरी बरसत होत्या. मात्र, शेतीच्या कामांना जसा पाऊस आवश्यक होता, तसा पाऊस झाला नाही. पण, बुधवारी दुपारपासून बरसलेल्या पावसाने बळीराजा सुखावला आहे. त्यामुळे आतातरी पावसाने आपला लपंडाव थांबवून अशीच पर्जन्यवृष्टी करावी असे साकडे बळीराजाने वरुणराजाला घातले आहे.