रत्नागिरी (चिपळूण)- हवामान खात्याने वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार कोकणात सोमवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे चिपळूण शहरातील वाशिष्टी नदीला पूर आला आहे. त्यामुळे पुराचे पाणी बाजारपेठेत शिरण्यास सुरुवात झाली आहे. नदी पात्रातील पाण्याची वाढती पातळी पाहता स्थानिक प्रशासनाने नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
वाशिष्टी नदीच्या प्रवाहाला कोयनेच्या पाण्याचा विसर्ग असल्याने आणि पावसाचा जोर कमी होत नसल्यामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढतच आहे. प्रशासनाने बाजारपेठेतील व्यावसायिकांना आपल्या दुकानातील माल हलवण्यास सांगितले आहे. चिपळूणचे प्रांताधिकारी प्रविण पवार यांनी चिपळूण नगर परिषद येथे प्रत्यक्ष भेट देऊन पूर नियंत्रण कक्षाचा आढावा घेतला.
यावेळेस मुख्याधिकारी डॉ.वैभव विधाते यांनी नगर परिषदेने केलेली तयारीबाबत माहिती दिली. गेल्या वर्षी भरलेल्या पाण्याचा अनुभव लक्षात घेऊन नगर परिषदेने अधिकची तयारी केली आहे. शहरातील पाणी भरणारी ठिकाणे निश्चित केली असुन, सात स्वतंत्र पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामधे विभाग प्रमुखांसोबत सात कर्मचारी आणि दहा सफाई कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे.
नगर परिषदेचा नियंत्रण कक्ष 24 तास सुरू असून, अधिकचे कर्मचारी नियुक्त केले आहेत. नगर परिषदेने यंदा नवीन साहित्य खरेदी केले आहे. तसेच तीन बोटी भाडेतत्वावर घेतल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. यावेळी सतत पडणाऱया पावसाचा विचार करून नगर परिषद, नागरिक व व्यापारी यांनी सतर्क रहाण्याच्या सुचना प्रांत अधिकारी यांनी दिल्या आहेत. पावसाचा जोर अजूनही सुरू असल्याने पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे .