रत्नागिरी- मुसळधार पावसाने दक्षिण रत्नागिरीसह दापोली आणि गुहागरला झोडपले आहे. या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. सोमवारी संध्याकाळी सुरू झालेला मुसळधार पाऊस मंगळवार पहाटेपर्यंत बरसत होता. मात्र,सकाळपासून पावसाचा जोर ओसरला आहे.
200 मिमी पेक्षाही जास्त पाऊस विजांच्या कडकडाटांसह दक्षिण रत्नागिरीला पावसाने चांगली हजेरी लावली होती. रत्नागिरी, लांजा आणि राजापूर, गुहागर तसेच दापोलीमध्ये पावसाने चांगलीच बॅटिंग केली. त्यामुळे दक्षिण रत्नागिरीमधील जनजीवन विस्कळीत झाले होते. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी बाजारपेठेत पाणी साचले. तसेच मुख्य रस्त्यासह शहराच्या विविध भागात पाणी तुंबले. तर रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे पाटीलवाडी येथे पुलावरून पाणी गेल्याने 16 गावांचा संपर्क तुटला.
दरम्यान राजापूर शहरातील जवाहर चौक येथील पिकअप शेडपर्यंत पाणी पोहचल्याने काही दुकानदारही धास्तावले होते. गुहागर-भातगाव मार्गावर दरड कोसळल्याने हा मार्ग बंद आहे. तसेच मुसळधार पावसाने धामणसे ओरी रस्त्यावर रत्नेशवर मंदिर येथील मोरीवरील रस्ता खचल्याने धामणसे ओरी वाहतूक बंद झाली आहे.
गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 100 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यांमध्ये पडला आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये यावर्षी पहिल्यांदाच एका दिवसांत 200 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. गेल्या 24 तासांत राजापूरमध्ये 251 तर रत्नागिरीमध्ये 212 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल लांजा तालुक्यामध्ये 117 तर गुहागरमध्ये 116 तर दापोलीमध्ये 101 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी आणि राजापूरमध्ये 200 मिमी पेक्षाही जास्त पावसाची नोंद झाली आहे.