रत्नागिरी - वाढलेल्या तापमानाचा फटका आंब्याला बसत असून त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. उन्हामुळे आंबा भाजून निघाला आहे, मोठ्या प्रमाणात फळगळ देखील होऊ लागली आहे. त्यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे. मात्र, शेतकऱ्यांना नुकसान होत असताना शासन मात्र आपल्याकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत आंबा उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत.
उन्हाच्या झळांचा आंब्याला फटका -
मध्य महाराष्ट्रात वातावरणातील चक्रीय परिस्थितीने उष्णतेची लाट कोकणकिनारपट्टीपर्यंत दाखल झाली. प्रखर सुर्यकिरणांच्या झळांनी रत्नागिरीकरही त्रस्त झाले आहेत. मार्च महिन्यात कधी नव्हे एवढा पारा कोकणात वाढला. तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपेक्षाही वाढले होते. त्याचा परिणाम हापूसवर झाला आहे. यावर्षी एक महिना हंगाम उशिरा असल्यामुळे तिसऱ्या टप्प्यात आलेल्या मोहोराला छोटी कैरी धरलेली आहे. ती कैरी गळून पडत आहे. पहिल्या टप्प्यातील आंबा १० टक्केच होता. त्याची तोड बहूतांश पूर्ण होत आली आहे. दुसर्या टप्प्यातील मोहोराला आलेल्या आंब्याची तोड सुरु असून तो उष्णतेच्या लाटेत सापडला आहे. प्रखर सुर्यकिरणांच्या तडाख्यात सापडून झाडाच्या दक्षिण व पश्चिमेकडील फळे भाजून निघाली आहे. फळांच्या आतील भागात साका तयार होण्याची भिती अधिक आहे. भाजलेला आंबा गळून जात आहे, याचा परिणाम उत्पादनावर होत आहे.