रत्नागिरी - महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली तर ती सर्वांनाच महागात पडेल, असा सुचक इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिला आहे. ते आज (शुक्रवार) दापोली दौऱ्यावर आले असता बोलत होते. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, पण ती येण्याची मनाला भिती वाटते, असं सांगत महाराष्ट्राच्या जनतेला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सावध केलं आहे.
मास्क आणि शारिरिक अंतर बंधनकारक -
यावेळी बोलताना ते म्हणाले की, मुंबईत सुद्धा कोरोना रुग्णांच्या संख्येत थोडी-थोडी वाढ होतेय. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेनी केरळ आणि दिल्लीचा बोध घेतला पाहिजे, असं सूचक विधान आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं. केरळ आणि दिल्लीत कोरोनाचा ग्रोथ रेट वाढतोय. त्याला एकमेव कारण लोकं मास्क वापरत नाहीत आणि सोशल डिस्टसिंगचे पालन करत नाहीत. त्यामुळे दुसरी लाट थोपवण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेनी हे कटाक्षाने पाळण्याचं आवाहन टोपे यांनी केलं आहे.
कोरोनाची दुसरी लाट आली तर ती सर्वांनाच महागात पडेल - आरोग्यमंत्री राजेश टोपे - आरोग्यमंत्री राजेश टोपे
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली तर ती सर्वांनाच महागात पडेल, असा सुचक इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिला आहे. राज्यातील जनतेने दिल्ली व केरळ राज्याचा बोध घ्यावा असा सल्लाही आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे.
मुलांची सुरक्षा महत्वाची -
सोमवारपासून शाळा सुरु होत असताना मुलांची सुरक्षा महत्वाची असल्याचं टोपे यांनी सष्ट केलं. शाळांचे निर्जंतुकरणासाठी शिक्षकांना जे काही जमतं ते त्यांनी करावं, अन्यथा दुसऱ्याला त्याचा ठेका देवून काम करून घ्यावं, असेही टोपे यांनी सांगितले.
स्वंयशिस्त पाळली पाहिजे -
महाराष्ट्रात सर्व गोष्टी आपण खुल्या केल्या आहेत. आता सरकार लग्नांसाठी उपस्थितांची संख्या वाढवणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिलीय. कोरोनाला कुणी गृहित धरू नये, सर्वांनी काळजी घ्यावी, स्वंयशिस्त पाळली पाहिजे, तरच दुसऱ्या लाटेवर मात करणं शक्य असल्याचा पुनरुच्चार आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केला आहे.