रत्नागिरी - खेडचे मनसे नगराध्यक्षांनी महामार्ग अधिकाऱ्याला जगबुडी पुलाला बांधून ठेवल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तब्बल १ महिन्यानंतर आज त्यांना जामीन मिळाला आहे. उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवरील नवीन पुल खचल्याने मनसे कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. त्यावेळी महामार्गाचे कार्यकारी अभियंता बामणे आणि उपअभियंता गायकवाड हे दोघे रस्त्याची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांना पुलाबद्धल विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संतापून अधिकाऱ्याला पुलाला बांधून ठेवले होते. याप्रकरणी मनसे नगराध्यक्ष वैभव खेडेकर व इतर मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याविरोधात मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. दरम्यान, उच्च न्यायालयाने आज त्यांना जामीन मंजूर केले आहे. त्यामुळे रत्नागिरीच्या विशेष कारागृहातून त्यांची सुटका झाली आहे.