रत्नागिरी -गुहागर तालुक्यातील सडेजांभारी येथील एका तरुणाने स्वतः कोरोनानाबाधित आहे, हे माहीत असतानाही ते लपवून ठेवून तो लग्ननासाठी उभा राहिला. त्यामुळे 23 जणांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले असून, वऱ्हाडी मंडळीला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार गुहागर तालुक्यातील शीर या गावी घडला आहे. सुरज पांडुरंग घेवडे असे दंड करण्यात आलेल्या नवरदेवाचे नाव आहे.
नवरा कोरोनाबाधित असल्याचे समोर
गुहागर तालुक्यातील सडेजांभारीतील सुरज घेवडे या तरुणाचे लग्न शीरमधील मुलीबरोबर ठरले होते. हा विवाह 5 मे रोजी होता. विवाहासाठी प्रांताकडून परवानगीही घेतली होती. त्यातील अटींप्रमाणे वधुवराकडील मंडळींनी आबलोलीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात 4 मे रोजी कोरोना तपासणी केली. प्रांताच्या परवानगीची एक प्रत शीर ग्रामपंचायतीला प्राप्त झाली होती. आपल्या गावात कोरोनाचा प्रार्दुर्भाव होवू नये, म्हणून सजग असलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाने वधुकडील मंडळींचे कोरोना तपासणी अहवाल तपासले होते. 5 मे रोजी शीरचे सरपंच विजय धोपट, तंटामुक्ती अध्यक्ष अनंत पवार, तलाठी बी. एच. राठोड, ग्रामसेवक एकनाथ पाटील, पोलीस पाटील संदिप घाणेकर आदी विवाहस्थळी गेले. वरपक्षाकडे कोराना तपासणीचा अहवाल मागितला. वरपक्षाने आम्ही तपासणी केली आहे, मात्र रिपोर्ट आणले नाहीत असे सांगितले. वरपक्षाकडील कोरोना चाचणीची खातरजमा व्हावी म्हणून तलाठी, ग्रामसेवक यांनी आबलोली प्राथमिक केंद्रात चौकशी केली. त्यावेळी नवरा कोरोनाबाधित असल्याचे समोर आले.