रत्नागिरी- आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. प्रहार अपंग क्रांती संस्था आणि रत्नागिरी जिल्हा अपंग समन्वय समिती यांच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये जिल्ह्यातील शेकडो दिव्यांग बांधव सहभागी झाले होते.
प्रलंबित मागण्यांसाठी दिव्यांग बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - प्रहार
विविध मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती संस्था आणि रत्नागिरी जिल्हा अपंग समन्वय समिती यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
जिल्ह्यातील हजारो दिव्यांग बांधवांची अद्याप ऑनलाईन नोंदणी झालेली नाही. त्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाहीत. म्हणून दिव्यांगासाठीचे ऑनलाईन प्रमाणपत्र काढण्यासाठी पूर्वीप्रमाणे रत्नागिरी व कामथे या दोन केंद्रावर नोंदणी व्हावी. अंत्योदय योजना व संजय गांधी निराधार योजना राबविताना वार्षिक उत्पन्नाची अट वाढवावी व योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. दिव्यांगासाठी राखीव 5 टक्के निधीचा प्रभावीपणे वापर व्हावा. खासगी आस्थापनांवर दिव्यांगांना रोजगार मिळावा. स्वयंरोजगारासाठी नगरपंचायत तसेच ग्रामपंचायत हद्दीमध्ये जागा मिळावी. शासकीय सर्व समित्यावर अपंग प्रतिनिधी नेमताना जिल्हा समन्वय समितीशी चर्चा होऊन प्रतिनिधी नेमावा. जिल्हा रुग्णालय परिसरात दिव्यांगांचा संपर्क व समस्या सोडविण्यासाठी तसेच विश्रांतीसाठी छोट कार्यालय उपलब्ध व्हावे. 5 टक्के राखीव निधी वाटप कमिटीमध्ये फक्त दिव्यांग व्यक्तीलाच सदस्य पदी नेमावे. जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे समवेत संघटनेची त्रैमासिक सभा व्हावी, आशा मागण्या दिव्यांग बांधवांच्या असून या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
हेही वाचा -नाणार नाही होणार; शिवसेना १ मार्चला पुन्हा एकदा भूमिका करणार स्पष्ट