रत्नागिरी - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सुचना जाहीर करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवासाठी रत्नागिरीमध्ये एक ते दिड लाख चाकरमानी येण्याची शक्यता आहे. त्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. एसटी बसेसच्या व्यवस्थेबाबत, चेकपोस्टवर करण्याच्या कार्यवाहीबाबत, स्क्रिनिंग सेंटरवर करावयाची कार्यवाही, ग्राम/वाडी/नागरी कृती दल यांनी करावयाची कार्यवाही, सीसीसीबाबत करावयाची कार्यवाही यासंबधित मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.
नागरी कृती दल आणि ग्राम कृती दल यांना गणेशोत्सव काळात अधिक सक्षमपणे काम करणे आवश्यक आहे. तालुका पातळीवरील नायब तहसीलदार , विस्तार अधिकारी , बीट अंमलदार , आशा वर्कर , अंगणवाडी सेविका , तलाठी , पोलीस पाटील , सरपंच यांची बैठक घेऊन या कालावधीत पार पाडावयाच्या जबाबदारीबाबत सूचना द्याव्या, गावागावातून , वाडी वस्तीवर हॅन्डबील , फ्लेक्स , बोर्ड लावावे.
होम क्वारंटाईन व्यक्तीने कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडता कामा नये, ही गोष्ट प्रत्येकाला समजली पाहिजे. यासाठी जास्तीत जास्त जागृती करावी. नागरी कृती दलाने नगरसेवकांचे मार्गदर्शनाखाली जनजागृतीमध्ये सहभागी व्हावे. नगरपरिषदेने पदाधिकाऱयांची बैठक घ्यावी. तसेच पोलीसांनी पोलीस मित्रांची मदत घ्यावी.