रत्नागिरी - गुहागर तालुक्यातील पिंपरे मठवाडीत राहणाऱ्या अनंत विश्राम देवळे यांच्या खूनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. चोरीच्या हेतूनेच अनंत देवळे यांची रेकी करून खून केल्याचे उघड झाले असून या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.
गुहागर तालुक्यातील पिंपरे मठवाडीत राहणाऱ्या अनंत विश्राम देवळे यांच्या खूनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले यावर्षी ऑगस्ट महिन्यात अनंत देवळे (वय-50) यांचा अज्ञातांनी खून केला होता. पोलीस पाटील संजय घर्वे यांच्या तक्रारीनुसार गुहागर पोलीस स्थानकात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी 36 साक्षीदारांकडे तपास केला. दरम्यान, संशयित व्यक्तींचा मोबाईल सीडीआर तसेच डंम्प डाटा काढून आरोपींचा शोध सुरू होता. गुन्ह्याच्या दिवशी घटनास्थळाच्या ठिकाणी एक चारचाकी गाडी संशयितपणे फिरताना स्थानिकांनी पाहिले होते. या गाडीचा शोध पोलिसांकडून सुरू होता. सखोल तपास करूनही या गुन्ह्यात आरोपींचा शोध न लागल्याने या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्याकडे देण्यात आला. यानंतर स्वतंत्र गुन्ह्याचा उलगडा होण्यासाठी स्वतंत्र पथकाची नियुक्ती करण्यात आली.
संबंधित खून होण्याच्या काही दिवस आधी एक तरुण सफेद रंगाची अॅक्टिव्हा घेऊन देवळे यांच्या घराची पाहणी करून गेल्याची बाब समोर आली. यावेळी संबंधित तरुणाने आपल्याला शिकारीची आवड असून, परिसरात डुक्कर मारून आणल्यानंतर रात्रीच्यावेळी काही साहित्य लागल्यास मदत करण्याची मागणी केली होती.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सागर दिनेश साळवी (26, रा. जामसुद, मराठवाडी, गुहागर) आणि योगेश मनोहर मेस्त्री (35, रा. मेढा मालवण, सिंधुदुर्ग) या दोघांचा खूनात सहभाग असल्याचे पुढे आले. या दोघांनाही पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून वॅगनर (एमएच-04-ईडी-5642) जप्त करण्यात आली आहे.
आरोपींनी देवळे यांच्या घरी चोरी करण्याच्या हेतूने त्यांना शिकारीच्या बहाण्याने बाहेर बोलावले. यानंतर त्यांना घराच्या पाठीमागे नेऊन ठार केले. देवळे यांच्या कपाटातील सोने, चांदीचे दागिने आणि साडेचार हजाराची रोकड लंपास केली.
पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी संबंधित गुन्ह्याचा तपास केला.