रत्नागिरी- निसर्ग वादळात झालेल्या नुकसानीसाठी सरकारने मदत केली नाही. गडचिरोलीत तातडीने मदत पोहोचली असती, पण कोकणात पोहोचली नाही, अशाप्रकारे खोटी दिशाभूल करणारी वक्तव्य भाजपकडून सातत्याने होत आहेत. मात्र, वस्तुस्थिती कोणी सांगत नाही. निसर्ग वादळातील नुकसानीसाठी ३६० कोटी रुपयांची मागणी होती, त्यातील रत्नागिरी जिल्ह्यासाठी ११६ कोटी रुपयांची मदत शासनाने दिली आहे. ५४ कोटींचे वाटप झाले, ६२ कोटींचे वाटप सुरू आहे, अशीच मदत रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाली आहे. उर्वरित रक्कम येत्या काही दिवसात कोकणसाठी मिळेल, अशी माहिती देत भाजपच्या वक्तव्यांचा आज रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब व सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी समाचार घेतला.
रविवारी रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब व सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे निसर्ग चक्रीवादळ, कोरोना, आणि भाजपच्या वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना परब यांनी 'निसर्ग' चक्रीवादळ नुकनीसाठी शासनाकडून करोडोंची मदत आली असतानाही भाजपवाले कोकणवासीयांची दिशाभूल करत असल्याचा घणाघाती आरोप केला तर उदय सामंत यांनी वस्तुस्थिती विशद करत भाजपची पोलखोल यावेळी केली. विरोधकांच्या बोलण्यावर आम्ही विचलीत होत नाही. वेळपडली तर रस्त्यावर उतरून काम करणारे आम्ही सैनिक आहोत. भाजपचे आत्मनिर्भर म्हणजे जनतेमध्ये गैरसमज निर्माण करणे एवढेच असून
आत्मनिर्भरच्या नावाखाली भाजप वाले कोकणवासीयांची दिशाभुल करत असल्याची टीका पालकमंत्री अनील परब व उदय सांमत यांनी केली.