रत्नागिरी - जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत आम्ही स्थानिकांसोबत असून स्थानिकांची भूमिका ती आमची भूमिका असेल अशी प्रतिक्रिया उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी ( Uday Samant statement on Jaitapur project ) दिली आहे. रत्नागिरी येथे ते बोलत होते.
'जनतेशी बोलून आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू'
यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले की, शिवसेनेने या प्रकल्पाला पहिल्यापासून विरोध केलेला होता. केंद्र सरकारने कालच याबाबत निर्णय घेतलेला आहे. प्रकल्प कशा पद्धतीने होणार आहे हे अजून निश्चित झालेले नाही. पण इतक्या वर्षाच्या कालावधीनंतर केंद्र शासनाने पुन्हा एकदा निर्णय प्रकल्पाच्या संदर्भात घेतलेला आहे. त्यामुळे बऱ्याच कालावधीनंतर या प्रकल्पाला चालना मिळाली आहे, असे केंद्र सरकारने सांगितले आहे. त्यामुळे तिथल्या जनतेशी चर्चा करूनच आम्हाला सर्वांना निर्णय घ्यावा लागेल. तिथल्या जनतेशी बोलून आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू असे उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
'टीईटी परिक्षेत घोटाळा करणाऱ्यावर कारवाई होणारच'
टीईटी परिक्षा घोटाळ्यावर प्रतिक्रिया देताना उदय सांमत ( Education minister on TET scam ) म्हणाले की, कुणीही कितीही मोठा अधिकारी असला आणि त्यांने वाईट काम केले असेल तर कारवाई होणारच, त्यांना तुरुंगात टाकू. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचे नुकसान करण्याचे धाडस पुन्हा कुठल्याही अधिकाऱ्याचे होणार नाही अशी कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत दिली आहे.