अहमदनगर- जिल्ह्यातील दक्षिण भागातील शेवगाव-पाथर्डी तालुक्याला अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला आहे. त्यामुळे, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. अतिवृष्टीमुळे मेटाकुटीला आलेल्या आणि मदतीच्या अपेक्षेत असलेल्या बळीराजाला तुमची दिवाळी गोड करू, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. मात्र, पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी अजून पंचनामे झालेले नाहीत, जमिनीच वाहून गेल्यात, आता कसले पंचनामे करणार, अन्न गोड लागेना अशा विविध तक्रारी केल्या.
जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी हा दुष्काळी पट्टा आहे. जायकवाडीच्या बॅक वॉटरवर कसेबसे कपाशीचे पीक या भागात उभे केले जाते. मुळात ऊसतोडणी कामगार असलेला या भागातील शेतकरी यावर्षी कधी नव्हे इतका अडचणीत आला आहे. जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने आधीच बॅक वाटरमुळे अनेकांच्या शेत जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. असे असताना अतिवृष्टीमुळे ज्या भागात कापशीचे पीक होते, ते पण पाण्यात गेले.