रत्नागिरी- मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे संविधानकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आहे. निसर्ग चक्रीवादळ आले त्यादिवशी अनेकांनी गावातील डॉ. आंबेडकरांच्या स्मारकात आसरा घेतला. या स्मारकामुळे अनेकांचे जीव वाचले आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले. या गावाला पालकमंत्री अनिल परब यांनी भेट देत इथल्या ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण झालेल्या या गावात त्यांचे एक स्मारक उभारण्यात आले आहे. आंबडवे गावालाही निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला आहे. पालकमंत्री अनिल परब यांनी आपल्या दौऱ्यात या गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या स्मारकात थांबलेल्या काही जणांशी संवाद साधला. या स्मारकात गावकऱ्यांनी आसरा घेतला आणि त्यांचा जीव वाचला, असे ग्रामस्थ भागुराम सकपाळ यांनी सांगितले.