रत्नागिरी -तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर चांगलाच जाणवला. किनारपट्टी भागातील घरांचे मोठे नुकसान झाले आहे. खाडीपट्ट्यातह याचा प्रभाव जाणवला. रत्नागिरीच्या खाडीपट्ट्याशेजारी असणाऱ्या कर्ला-आंबेशेत गावात मोठ्या झाडांची पडझड झाली. या वादळातील अंगावर शहारे आणणारा प्रसंग कर्ला येथील कळंबटे कुटुंबीयांनी अनुभवला. याच संकटातून आजोबांनी आपल्या नातवासह आपल्या कुटुंबाला बाहेर काढले. मात्र, या घटनेत त्यांच्या पत्नीच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांच्या डोक्याला आठ टाके पडले आहे.
वादळाच्या संकटात 65 वर्षांचे आजोबा बनले कुटुंबाचे ढाल जीव धोक्यात घालून वाचवले नातवाला
कर्ला आंबेशेत गावातील अशोक कळंबटे (वय 65 वर्षे) यांनी तौक्ते चक्रीवादळाचा जीव धोक्यात टाकत सामना केला आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यात आजोबांच्या घरावर जुनाट 2 वृक्ष कोसळले. त्यावेळी घरात अशोक कळंबटे, त्यांच्या पत्नी सुगंधा, सून रुणाली व नातू वेदांत, असे चार जण होते. झाड कोसळण्याच्या दिशेतच नातू वेदांत असल्याच्या त्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. वेदांतला सुखरुप काढले. यात त्यांच्या पत्नी सुगंधा यांच्या डोक्याला पत्रा लागल्याने दुखापत झाली असून आठ टाके पडले आहेत. आपल्या नातवाच्या अंगावर येणारे पत्रे स्वतः आजोबांनी आपल्या पाठीवर झेलले. त्यांच्या पाठीलाही यात दुखापत झाली आहे. मात्र, वादळाच्या या संकटात आजोबा नातवापुढे सावलीसारखे उभे राहीले आजोबांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या नातवाला वाचवले तसेच कुटूंबाची ढाल बनून आजोबा पुढे आले.
हेही वाचा -तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा; मुंबई - गोवा महामार्गावर कोसळली दरड