महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 28, 2020, 3:45 PM IST

ETV Bharat / state

गणेशोत्सवासाठी गावात या.. पण 14 दिवस क्वारंटाईन व्हा; रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे नागरिकांना आवाहन

गणेशोत्सव हा कोकणातील एक महत्त्वाचा उत्सव आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात असलेला कोकणी माणूस या उत्सवाला हमखास गावी येतो. पुणे-मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या यामध्ये लक्षणीय असते. त्यासाठी दरवर्षी काही महिने अगोदरच नियोजन सुरू असते. यावर्षी मात्र परिस्थिती काहीशी वेगळी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावागावांतील ग्रामपंचायती गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी आत्तापासूनच नियोजन करत आहेत.

Ratnagiri Ganeshotsav
रत्नागिरी गणेशोत्सव

रत्नागिरी -काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी ग्रामपंचायत प्रशासन विशेष खबरदारी घेत आहे. गणेशोत्सवादरम्यान कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी गावात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी काही विशेष सूचना जाहीर केल्या असून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

गणेशोत्सव हा कोकणातील एक महत्त्वाचा उत्सव आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात असलेला कोकणी माणूस या उत्सवाला हमखास गावी येतो. पुणे-मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या यामध्ये लक्षणीय असते. त्यासाठी दरवर्षी काही महिने अगोदरच नियोजन सुरू असते. यावर्षी मात्र परिस्थिती काहीशी वेगळी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आगामी गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट आहे. त्या पार्श्वभूमीवर गावागावांतील ग्रामपंचायती गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी आत्तापासूनच नियोजन करत आहेत. चाकरमान्यांसाठी काही मार्गदर्शक सूचना ग्रामपंचायतींनी जारी केल्या आहेत. गणेशोत्सवासाठी ५ ऑगस्टपूर्वीच गावात या, १४ दिवसांसाठी क्वारंटाईन व्हा, अशी विनंती ग्रामपंचायतींकडून चाकरमान्यांना करण्यात येत आहे. चाकरमान्यांकडूनही गावकऱ्यांना यासाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी गावात येणाऱ्या चाकरमान्यांना ग्रामपंचायत प्रशासनाने क्वारंटाईन होण्याचे आवाहन केले

गावी आल्यानंतर चाकरमान्यांना सुरक्षेच्यादृष्टीने होम क्वारंटाईन आणि शक्य असल्यास इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात येईल. उत्सव कालावधीत गावात, वाडीमध्ये सार्वजनिक ठिकाणी सत्यनारायण पूजेसारखे अन्य कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत. उत्सव कालावधीत वाडीमध्ये एकत्र येवून आरती, भजन करू नये. गणपतींची आरती मर्यादित स्वरुपात आणि सामजिक अंतर ठेऊन करावी. गौरी-गणपती निमित्त होणारे इतर सार्वजनिक कार्यक्रम(उदा.महिलांचा हळदी-कुंकू कार्यक्रम) रद्द करावेत. गणपतीचे आगमन तसेच विसर्जनासाठी मिरवणुकांचे आयोजन करू नये. गणेशोत्सव काळात मास्कचा वापर करणे सर्वांना बंधनकारक राहिल. मास्क न वापरता घराबाहेर पडल्यास प्रत्येकी 500 रुपये दंड आकारला जाईल, अशा सुचना काही ग्रामपंचायतींकडून जाहीर करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, रत्नागिरी तालुक्यातील वरवडे ग्रामपंचायतीने देखील गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष खबरदारीच्या सूचना जाहीर केल्या आहेत. चाकरमान्यांकडूनही याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही मुंबईतील चाकरमान्यांनी कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन, यावर्षी गावी न येण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती वरवडे गावचे सरपंच निखिल बोरकर यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details