रत्नागिरी -महाविकास आघाडीकडून दिलेल्या यादीवर 15 दिवसांत राज्यपालांनी निर्णय घ्यावा, अशी विनंती महाविकास आघाडीने केली आहे. याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. राज्यपाल लवकरच यादीला मंजुरी देतील, असा विश्वासही जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. ते रत्नागिरी येथील सावर्डे येथे पत्रकारांशी बोलत होते.
आमदारांच्या यादीवर 15 दिवसांत राज्यपालांनी निर्णय घ्यावा - जयंत पाटील
महाविकास आघाडीने आमदारांची यादी राज्यपालांच्याकडे दिली आहे. या विधानपरिषद आमदारांच्या यादीला राज्यपाल लवकरच मंजुरी देतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
त्यांची नाराजी आम्ही दूर करू-
राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी अनेक जण इच्छूक होते, मात्र सर्वांचीच इच्छा आम्ही पूर्ण करू शकत नसल्याचे यावेळी जयंत पाटील म्हणाले. तसेच ज्यांना संधी मिळाली नाही ते नाराज असणे स्वाभाविक आहे, पण त्यांची नाराजी आम्ही दूर करू, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांच्या ट्विटला जयंत पाटील यांचे प्रत्युत्तर
घरात बसून चंद्रकांत दादांनी ट्विट करून काय भूमिका व्यक्त केली, यावर मी प्रतिक्रिया व्यक्त करण्याची काही आवश्यकता आहे, असे मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा करून मराठा तरुणांचा विश्वासघात केला आहे. राज्य सरकारने मराठा तरुणांच्या पाठीत खंजीर खुपसला. पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार त्यांना निश्चितच महागात पडणार आहे, असे ट्विट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीने मराठा तरुणांचा विश्वासघात करण्याचा प्रश्नच नाही. मराठा समाजाचे आरक्षण टिकावे, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. पण घरात बसून चंद्रकांत दादांनी ट्विट करून काय भूमिका व्यक्त केली, यावर मी प्रतिक्रिया व्यक्त करण्याची काही आवश्यकता आहे, असे मला वाटत नाही. दरम्यान पत्रकार अर्णव गोस्वामी यांना झालेल्या अटकेवरून आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजपाला जयंत पाटील यांनी फटकारले आहे. याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाई का झाली, याचा अभ्यास भाजपाने केलेला दिसत नाही.
... त्यात वावगे ते काय-
राष्ट्रवादीवासी झालेले एकनाथ खडसे यांच्या सुनबाई खासदार रक्षा खडसे केळी उत्पादकांच्या प्रश्नावरून मोर्चा काढणार आहेत. याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, रक्षा खडसे या भारतीय जनता पक्षाच्या खासदार जरी असल्या तरी जिल्ह्यातल्या केळी उत्पादकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने त्या भूमिका मांडत आहेत, त्यात वावगे ते काहीही नाही. असे म्हणत जयंत पाटील यांनी एकप्रकारे रक्षा खडसे यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.
हेही वाचा- Exclusive : नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासातील एल अँड टी कंपनीचे कंत्राट होणार रद्द!