रत्नागिरी - जिल्हा रुग्णालयात कोरोना स्वॅब तपासणी लॅब उभारण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात आरटी पीसीआर लॅब नसल्याने कोरोनाच्या चाचणीसाठी स्वॅब नमुने मिरज येथे पाठविण्यात येतात. त्यामुळे तपासणी अहवाल मिळण्यास अनेकदा विलंब होतो. म्हणून रत्नागिरी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे अशी प्रयोगशाळा हवी अशी मागणी होत होती. या स्वरुपाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनातर्फे शासनाला पाठविण्यात आला होता.
रत्नागिरी ते मिरज हे अंतर 200 किमी पेक्षा जास्त आहे. रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती व दळणवळणाचा विचार करता हा भाग डोंगराळ व दुर्गम असल्याने, कोव्हीड -19 च्या चाचणीसाठी स्वॅब नमुन्यांचे परिवहन व चाचणीकरता बराच वेळ व मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. त्यात सध्या मुंबई व पुणे येथील चाकरमानी कुटुंब रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात येत आहेत. यातील बहुतांश कुटुंबे ही कंटेनमेंट झोन / हॉटस्पॉट झोन / रेड झोनमधील असल्याने, या सर्व नागरिकांचे आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ILIVSARI लक्षणे असल्यास, कोव्हीड -19 ची तपासणी करणे अनिवार्य ठरत आहे.