रत्नागिरी - नैसर्गिक आपत्तीपाठोपाठ कोरोनामुळे आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे. आंबा उत्पादक पुरता कोलमडला आहे. यासाठी कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी 50 टक्के अनुदान जाहीर करावे, अशी मागणी भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना ट्विट करून त्यांनी ही मागणी केली आहे..
आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी 50 टक्के अनुदान जाहीर करा कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी ज्यावेळी राज्यातील लॉकडाऊनमध्ये वाहतूक बंद करण्यात आली, त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा तयार झालेला माल बागायतीमध्ये तसाच पडून असल्याचे निलेश राणे यांनी कोकणातील जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. हा आंबा नाशिवंत माल असलेने बाजारपेठेत पोहोचणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले होते. याबाबत रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना ईमेल देखील केला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी मिश्रा यांनी तत्काळ दखल घेऊन आंबा तसेच नाशिवंत असलेल्या कृषी मालाची वाहतूक करण्याचे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी आणि कृषी अधिकाऱयांना दिले होते.
त्यानंतर ज्या ठिकाणी बाजारपेठेत आंबा व कोकणातील उत्पादन झालेली अन्य फळे जातात त्या ठिकाणी हा उत्पादन झालेला माल उतरवून घेण्यास तेथील व्यापाऱ्यांनी नकार दिला. या सर्व प्रकरणात वेळेत माल न पोहोचल्याने आंबा शेतकऱ्यांना मोठया अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
मुळातच हवामानाच्या बिघडलेल्या चक्रात आंबा शेतकरी अडकलेला असताना यावर्षी उत्पादन जेमतेम होत होते. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत पाऊस राहिल्याने आधीच आंबा पीक संकटात आले, आणि त्यातच आता कोरोनाच्या संकटामुळे आंबा बागायतदारांचे कंबरडे मोडणार आहे. यावर्षी आंबा पिकाचे मोठ्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यातून आंबा व्यावसायिक अडचणीत आला आहे. याबाबत अनेक आंबा व्यावसायिकांनी निलेश राणे यांच्याशी संपर्क साधून आपली व्यथा मांडली.
याची दखल निलेश राणे यांनी घेतली आहे. याबाबत राज्याचे उप मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना ट्विट करून आंबा पिकासाठी शासनाने 50 टक्के अनुदान जाहीर करावे अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे.