रत्नागिरी - भाजप आणि अंत्योदय प्रतिष्ठानकडून पूरग्रस्त भागात गणेशमूर्तींचं वाटप करण्यात येणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात तब्बल एक हजार मूर्ती वितरीत केल्या जाणार आहेत. गणेश मूर्ती सोबतच पूजेच्या साहित्याचेही वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
यावर्षी पश्चिम महाराष्ट्र पुराच्या विळख्यात सापडला होता. पश्चिम महाराष्ट्रप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातही काही ठिकाणी पुराने हाहाकार माजवला होता. चिपळूण, राजापूर, खेड आणि रत्नागिरीत पुराच्या पाण्याने अनेकांचे संसार कोलमडले. घरातील साहित्य वाहून गेले. गणेश उत्सव काही दिवसांवर येवून ठेपला आहे. पुरामुळे घरातील होते नव्हते सगळे वाहून गेल्याने गणेश उत्सव साजरा कसा करायचा याची चिंता पूरग्रस्त नागरिकांना आहे. अशाच पूरग्रस्त लोकांच्या घरी भाजप आणि अंत्योदय प्रतिष्ठानमुळे गणराया अवतरणार आहेत.
भाजप आणि अंत्योदय प्रतिष्ठानकडून जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात गणेशमूर्तींचं वाटप पश्चिम महाराष्ट्रप्रमाणे कोकणातल्या अनेक गणेश चित्रशाळा पुराच्या पाण्यात होत्या. त्यामुळेच अनेक ठिकाणी गणेशमूर्ती मिळणे कठीण झाले आहे. अनेक पुरग्रस्त घरात गणेशोत्सव साजरा करणे फारच अवघड होवून बसले आहे. कोकणात गणेशोत्सव हा दिवाळी सणापेक्षा मोठा साजरा केला जातो. त्यामुळेच अशा पूरग्रस्त गरजू घरात थेट गणरायाची मूर्ती देण्यात येत आहे. यासाठी भाजप आणि अंत्योदय संस्थेच्या माध्यमातून थेट मुंबईतून गणपती बाप्पाच्या मूर्ती आणल्या आहेत. रत्नागिरीत पाचशे आणि सिंधुदूर्गातील पाचशे पुरग्रस्तांच्या घरात या मूर्ती पोहोचवल्या जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चिपळूण शहरातील पुरग्रस्त भागात गणपत्ती बाप्पांची मूर्ती देण्यात आली आहे. गणरायाच्या मूर्तीसोबत पुजेचे साहित्य देण्यात आले. यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड, जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, चिपळूण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सुरेखा खेराडे, अंत्योदय प्रतिष्ठानच्या अध्यक्षा नीता लाड आदी उपस्थित होते.
दरम्यान, घरात अनपेक्षितपणे आलेल्या या गणरायाच्या मूर्तीमुळे पूरग्रस्तांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. यावर्षी आलेले पुराचे संकट पुन्हा कधी येऊ नये. अशी मागणी पूरग्रस्तांनी गणरायाच्या चरणी केली आहे.