रत्नागिरी - कणकवलीतील लढतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मैत्रीपूर्ण लढत असे नाव दिलेले आहे. मात्र, या मैत्रीपूर्ण लढतीत शिवसेनेचे सतीश सावंत हेच प्रचंड मताधिक्याने जिंकून येतील, असा विश्वास शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे. चिपळूण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार सदानंद चव्हाण यांच्या प्रचारार्थ राऊत शुक्रवारी चिपळूण तालुक्यातील पोफळी येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
कणकवलीतील लढत मैत्रीपूर्ण लढत - खासदार विनायक राऊत हेही वाचा -रत्नागिरीतील भाजपचे बंडोबा अखेर थंड; पाचही उमेदवारांनी अर्ज घेतले मागे
कणकवलीची जागा ही भाजपच्या वाट्याला जाणार हे आम्हाला माहिती होते. त्या ठिकाणी भाजपने त्यांच्या पक्षाचा कोणताही प्रामाणिक कार्यकर्ता द्यावा, पण ही घाण आम्हाला नको. त्यांचा प्रचार आम्ही करणार नाही असे शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाने कित्येकदा मुख्यमंत्र्यांना सांगितले होते. पण २८७ मतदारसंघात शिवसेना भाजप आणि घटक पक्षांची युती मजबूत आहे. पण कणकवली मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत चालू आहे, असेही राऊत म्हणाले.
हेही वाचा -नाणारबाबत बोलणाऱ्यांनी नको त्या विषयात नाक खूपसू नये - सुभाष देसाई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत नारायण राणेंबद्दल बोलताना राणेंनी शिवसेनेशी असलेली कटुता संपवावी असे वक्तव्य केले होते. याबाबत राऊत यांना विचारले असता असंगाशी संग करायचा कशाला, काही गरजच नाही असे म्हणत शिवसेना राणेंना कधीही जुळवून घेणार नाही हे स्पष्ट केले. राणेंचा पूर्वइतिहास पाहता आपल्याला आता भाजपची काळजी वाटत असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. राणेंनी ज्याप्रकारे शिवसेनेशी बेईमानी केली, काँग्रेसच्या नेतृत्वाला ज्याप्रकारे वेठीस धरले, काँग्रेसची निंदा नालस्ती केली तो दिवस काही दिवसानंतर भारतीय जनता पक्षात येऊ नये अशी मी भगवंताकडे प्रार्थना करतो असे म्हणत राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे.
हेही वाचा -मच्छिमारांच्या राज्यकर्त्यांकडून काय आहेत अपेक्षा? पाहा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही जागा शिवसेनेच्याच निवडून येतील आणि चिपळूण मतदारसंघात सदानंद चव्हाण यावेळी हॅटट्रिक साधतील असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. याचसंदर्भात आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी खासदार विनायक राऊत यांच्याशी बातचीत केली आहे.