रत्नागिरी - जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी गावातील वयोवृद्ध शेतकऱ्याच्या नावावर कर्ज घेऊन त्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. एक, दोन नव्हे तर, तब्बल सहा वेळा या शेतकऱ्याच्या नावाने पीक कर्ज घेऊन त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. कर्जमाफीच्या गाव चावडीच्या वाचनात हा सारा प्रकार उघड झाला.
बाळू भडवळकर (८१), असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. गावातील राजवाडी ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेतून त्यांनी 1991 मध्ये बैल मेल्यावर कर्ज घेतले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी कर्ज घेतले नव्हते. मात्र, याच सेवा सोसायटीवर असलेले सचिव संतोष भडवळकर यांनी त्यांच्या नावावर 6 वेळा कर्ज घेऊन पैसे परस्पर हडप केले. बाळू यांना फसवून त्यांच्या सह्या घेण्यात आल्या. मात्र, त्यांना एकही पैसा देण्यात आला नसल्याचा आरोप बाळू भडवळकर यांनी केला आहे.